मोठी बातमी! एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकरांना जामीन मंजूर; अखेर दोन महिन्यांनी दिलासा
पुण्यातून मोठी बातमी समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचे जावई आणि रोहिणी खडसे यांचे पती प्रांजल खेवलकर यांना अखेर दोन महिन्यांनंतर जामीन मंजूर झाला आहे. पुणे सत्र न्यायालयाने हा निर्णय देताच खेवलकर यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
पुण्यातील खराडी परिसरात काही दिवसांपूर्वी पोलिसांनी एका पार्टीवर छापा टाकला होता. या पार्टीत अंमली पदार्थ (ड्रग्ज) आढळल्याचा दावा पोलिसांनी केला होता. या प्रकरणात प्रांजल खेवलकर यांचे नाव मुख्य आरोपी म्हणून समोर आले होते. पार्टीत महिलादेखील उपस्थित असल्याने प्रकरण अधिक संवेदनशील बनले होते.
गेल्या दोन महिन्यांपासून कारागृहात असलेल्या खेवलकर यांना अखेर पुणे सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केला. सुनावणीदरम्यान अंमली पदार्थांचं सेवन खरंच झालं का? हा मुद्दा केंद्रस्थानी होता. न्यायालयाने दोन्ही बाजूंचे युक्तिवाद ऐकल्यानंतर खेवलकर यांना जामीन मंजूर केला. तसेच, त्यांच्या सोबत अटक केलेल्या सर्वांना जामीन मंजूर झाला आहे.
आज सुटका नाही
हा निर्णय होण्यास संध्याकाळ झाल्याने, जरी जामीन मंजूर झाला असला तरी खेवलकर यांची तात्काळ सुटका होऊ शकलेली नाही. आवश्यक कागदपत्रे पूर्ण करून कारागृह प्रशासनाला सुपूर्द करण्याची प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी वेळ लागेल. त्यामुळे त्यांची उद्या सुटका होण्याची अधिक शक्यता आहे.
जामीन मंजूर झाल्यानंतर प्रांजल खेवलकर यांच्या वकिलांनी सांगितले, तपास पूर्ण झाला असून चार्जशीट दाखल झाली आहे. आम्ही ड्रग्जचं सेवन केलं नव्हतं. आमच्याकडून कोणताही अंमली पदार्थ जप्त करण्यात आलेला नाही. त्या आधारावर आम्ही जामीन अर्ज दाखल केला होता. न्यायालयाने नेमके कोणत्या निकषांवर निर्णय दिला हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही.