
पुण्यातील कथित रेव्ह पार्टी प्रकरणी माजी नेते एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर यांच्यासह पाच आरोपींना सत्र न्यायालयाने गुरुवारी १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. त्यामुळे या प्रकरणातील सर्व आरोपींना आता जामिनाचा मार्ग मोकळा झाला आहे.
खराडी परिसरातील स्टुडिओ अपार्टमेंटमध्ये रविवारी (दि. २७) पहाटे पोलिसांनी ड्रग्ज पार्टीवर छापा टाकत मोठी कारवाई केली. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांचे पती प्रांजल खेवलकरसह ५ पुरुष आणि २ महिलांना अटक करण्यात आली. या ठिकाणी कोकेन, गांजा, हुक्का सेट-अप आणि दारूच्या बाटल्या जप्त केल्याचा दावा पोलिसांनी केला. यापूर्वी दोन्ही महिलांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. आता उर्वरित पाच जणांनाही न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले आहे.
न्यायालयाने पोलिसांची मागणी फेटाळली
PTI ने दिलेल्या वृत्तानुसार, प्रांजल खेवलकर आणि इतर आरोपींना पोलिस कोठडीत ठेवण्याची मागणी सरकारी वकिलांनी केली होती. त्यांनी न्यायालयाला सांगितले की, आरोपींच्या मोबाईल फोनमध्ये काही आक्षेपार्ह चॅट्स आणि व्हिडिओ सापडले आहेत, ज्यांची तपासणी करणे आवश्यक आहे. तसेच, ड्रग्जचा स्रोत शोधणेही महत्त्वाचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
मात्र, अतिरिक्त सत्र न्यायाधीश जे. जी. डोर्ले यांनी पोलिसांची मागणी फेटाळून पाचही आरोपींना न्यायालयीन कोठडीत पाठवले. त्यामुळे त्यांचा जामिनासाठीचा मार्ग खुला झाला आहे.
बचाव पक्षाचा युक्तिवाद
बचाव पक्षाचे वकील म्हणाले की, ज्या दोन महिलांच्या पर्समधून ड्रग्ज सापडले, त्या आधीच न्यायालयीन कोठडीत आहेत. त्यामुळे इतर आरोपींना पुन्हा पोलीस कोठडीत घेण्याची आवश्यकता नाही. न्यायालयाने हा युक्तिवाद मान्य करत सर्व आरोपींना न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचा निर्णय दिला.