उद्योगपती एलॉन मस्क यांच्या Tesla कंपनीने नुकतेच भारतात पहिले शोरूम सुरू केले असून, या शोरूममधून पहिली कार महाराष्ट्राचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी खरेदी केली आहे. एकेकाळी डोंबिवली येथे रिक्षा चालवणारे प्रताप सरनाईक Tesla खरेदी करणारे पहिले भारतीय ठरले आहेत. सरनाईक यांनी पहिली Tesla खरेदी करण्याचा निर्धार केला होता. ही कार त्यांनी आपल्या नातवाला भेट दिली आहे.
कार खरेदी केल्यानंतर सरनाईक म्हणाले, "टेस्लाची कार घेण्याची संधी मिळाल्याने मला आनंद झाला आहे. राज्याचा परिवहन मंत्री असल्याने मी ही कार घेण्याचा प्रयत्न केला. हा प्रयत्न यशस्वी झाला आहे. महाराष्ट्र शासन पर्यावरणपूरक गाड्या आणण्याचा प्रयत्न करत असते. माझ्या माध्यमातून मी जनजागृती करत आहे, की तुम्ही पर्यावरणपूरक गाड्याच खरेदी करा. आपल्या राज्यातील रस्त्यांवर इलेक्ट्रिक वाहनांची संख्या वाढावी यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. पुढील दहा वर्षांत असंख्य इलेक्ट्रिक गाड्या रस्त्यावर धावाव्यात, अशी आमची अपेक्षा आहे."
सरकारकडून इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन
सरनाईक यांनी यावेळी सांगितले की, अटल सेतू, समृद्धी महामार्गासह विविध ठिकाणी इलेक्ट्रिक वाहनांना सवलती दिल्या जात आहेत. तसेच, ई-वाहन उत्पादक कंपन्यांना सरकारकडून आवश्यक सुविधा पुरवल्या जात आहेत. पुढील दशकात इलेक्ट्रिक वाहने आपल्या राज्यात क्रांती घडवून आणतील," असे ते म्हणाले.
पहिली कार नातवाला भेट
विशेष म्हणजे, सरनाईक यांनी ही पहिली Tesla कार आपल्या नातवाला भेट म्हणून दिली आहे. "तो या गाडीतून शाळेत जाईल आणि इतर मुलांमध्ये इलेक्ट्रिक वाहनांविषयी जागरूकता निर्माण होईल," असे त्यांनी सांगितले.
टेस्ला Model Y ची किंमत
प्रताप सरनाईक यांनी Tesla चे Model Y खरेदी केले आहे. भारतामध्ये उपलब्ध असलेल्या या Model Y RWD व्हर्जनची किंमत सुमारे ५९.८९ लाख असून, LR RWD व्हर्जनची किंमत ६७.८९ लाख आहे. Model Y ही जगभरात Tesla ची सर्वाधिक विक्री होणारी कार मानली जाते.