

पुणे : बनावट सोने तारण ठेवून एका राष्ट्रीयीकृत बँकेची ४ कोटी २३ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोन सराफ व्यावसायिकांसह एकूण १३ जणांविरुद्ध गु्न्हा दाखल केला असून, आर्थिक गुन्हे शाखेने या प्रकरणाचा सखोल तपास हाती घेतला आहे. पुण्यातील सिंहगड रस्त्यावरील हिंगणे खुर्द भागात असलेल्या एका राष्ट्रीयीकृत बँकेच्या शाखेत हा फसवणुकीचा प्रकार घडला.
याप्रकरणी बँकेच्या शाखा व्यवस्थापकांनी सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून, पोलीस निरीक्षक दीपाली भुजबळ या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
बँकेने सोन्याची शुद्धता तपासण्यासाठी आणि त्याचे मूल्यमापन करण्यासाठी (व्हॅल्यूअर) काही सराफ व्यावसायिकांची नियुक्ती केली होती. मात्र, या व्यावसायिकांनीच बँकेशी प्रतारणा करत कमी शुद्धतेचे सोने तारण म्हणून स्वीकारले आणि ते पूर्णपणे शुद्ध असल्याचा बनावट अहवाल बँकेला सादर केला. या बनावट प्रमाणपत्रांच्या आधारावर एकूण २६ कर्ज प्रकरणांतून बँकेकडून ४ कोटी ४४ लाख रुपयांचे कर्ज मंजूर करून घेण्यात आले.
दरम्यान, काही काळाने या मूल्यमापनकारांनी दिलेल्या प्रमाणपत्रांबाबत बँक व्यवस्थापनाला संशय आला. बँकेने तातडीने तारण ठेवलेल्या सोन्याची दुसऱ्या यंत्रणेकडून पुनर्तपासणी केली असता, सोन्याची शुद्धता अत्यंत कमी असल्याचे समोर आले आणि ही मोठी फसवणूक उघड झाली.