

पुणे : पुण्यातील शिवाजीनगर येथील शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयात मनविसेच्या संपर्क मोहिमेदरम्यान मनसेचे युवा नेते अमित ठाकरे यांच्या उपस्थितीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे छायाचित्र हटवल्याने महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात मोठा वाद निर्माण झाला आहे. शासकीय तंत्रनिकेतन, गणेशखिंड येथील कार्यालयात विनापरवाना प्रवेश करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो काढून नेल्याप्रकरणी अमित ठाकरे यांच्यासह २५ कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, संध्याकाळी या प्रकारानंतर भाजप नेते व कार्यकर्त्यांनी महाविद्यालयात धाव घेतली. पण, त्याआधीच कॉलेज प्रशासनाकडून हा फोटो पुन्हा लावण्यात आला.
अमित ठाकरे हे विद्यार्थ्यांच्या विविध समस्या जाणून घेण्यासाठी आणि मनसेच्या सदस्य नोंदणी अभियानासाठी या महाविद्यालयात पोहोचले होते. यावेळी प्राचार्यांच्या दालनात छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या छायाचित्रांच्या शेजारी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे छायाचित्र लावल्याचे एका विद्यार्थ्याने अमित ठाकरे यांच्या निदर्शनास आणून दिले. यावर तीव्र आक्षेप घेत, छत्रपती शिवाजी महाराज आणि महामानवांच्या शेजारी पंतप्रधानांचे छायाचित्र कशासाठी, असा संतप्त सवाल ठाकरे यांनी तेथील वरिष्ठ अधिकाऱ्यांना आणि प्राचार्यांना विचारला. यानंतर अमित ठाकरे यांनी तत्काळ तो फोटो तेथून काढण्याचे आदेश दिले आणि मनसेच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक होत पंतप्रधानांचे छायाचित्र भिंतीवरून काढून घेतले.
याच दौऱ्यादरम्यान महाविद्यालयाच्या कॅन्टीनमध्ये ठाकरे यांनी तेथे धाड टाकली. अमित ठाकरेंनी कॅन्टीनची पाहणी केली असता तेथे चक्क सडलेले कांदे आढळले. मनसे कार्यकर्ते आक्रमक झाले आणि त्यांनी सडलेल्या कांद्यांचा क्रेट थेट प्राचार्यांच्या टेबलवर आणून आपटला.
मनसेच्या कृत्याचा भाजपकडून निषेध
या संपूर्ण घटनेनंतर भाजपचे पुणे महानगरपालिकेतील गटनेते आणि सभागृह नेते गणेश बिडकर यांनी अमित ठाकरेंच्या या कृतीला ‘राजकीय अज्ञान’ आणि ‘अपरिपक्वता’ असे संबोधत या कृत्याचा निषेध केला. शासकीय नियमांनुसार आणि राजशिष्टाचारानुसार राष्ट्रपती आणि पंतप्रधान यांचे छायाचित्र सर्व शासकीय कार्यालयांमध्ये लावणे बंधनकारक असते आणि हा फोटो कोणत्याही पक्षाच्या नेत्याचा नसून देशाच्या घटनात्मक पदावरील व्यक्तीचा असतो, याचे भान ठेवणे आवश्यक आहे, असे बिडकर यांनी स्पष्ट केले.
महाविकास आघाडीकडून समर्थन
महाविकास आघाडीतील पक्षांनी मात्र अमित ठाकरेंच्या या भूमिकेचे जोरदार समर्थन केले आहे. शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनीही अमित ठाकरेंच्या या कृतीचे अभिनंदन केले आणि महापुरुषांचे स्थान नेहमीच सर्वोच्च राहिले पाहिजे, असे मत मांडले.