

पुणे : गुलटेकडी (डायस प्लॉट) परिसरातील बांधकाम व्यावसायिक व कंत्राटदार खलील शेख यांनी आर्थिक विवंचनेतून राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. आत्महत्येपूर्वी त्यांनी सुसाईड नोट लिहिण्यासह काही व्हिडीओ रेकॉर्ड करून भागीदारांवर गंभीर आरोप केल्याने खळबळ उडाली आहे.
माहितीनुसार, लक्ष्मी रोड परिसरातील एका बांधकाम प्रकल्पासाठी स्थापन करण्यात आलेल्या 'उत्कर्ष असोसिएट्स' या भागीदारी संस्थेच्या प्रकल्पाला जागेबाबत निर्माण झालेल्या वादामुळे स्थगिती मिळाली होती. त्यामुळे प्रकल्प रखडून मोठे आर्थिक नुकसान झाल्याचे सांगितले जात आहे. शेख यांनी व्हिडीओमध्ये आपले सुमारे ५० लाख रुपये अडकल्याचा दावा करत, त्या रकमेवरील व्याजाचा मोठा आर्थिक भार सहन करावा लागत असल्याचे नमूद केले आहे. तसेच काही भागीदारांकडून धमक्या मिळाल्याचाही आरोप त्यांनी केला आहे.
दरम्यान, माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी शेख यांचा मृत्यू वाढत्या कर्जाच्या ओझ्यामुळे झाल्याचा दावा केला असून, प्रकल्प प्रशासकीय कारणांमुळे रखडल्याने सर्व भागीदारांचे नुकसान झाल्याचे सांगितले. पोलिसांनी घटनास्थळावरून सुसाईड नोट आणि व्हिडीओ जप्त केला असून, आर्थिक वादातून आत्महत्या झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करत पुढील तपास सुरू केला आहे.