

मुंबई : राज्यात पावसाने ओढ दिल्यानंतर धरणातील पाणीसाठा दिवसेंदिवस कमी होऊ लागला आहे. पुण्यातील धरणांमध्ये ‘जिवंत’ पाणीसाठा १४.३० टक्केच शिल्लक राहिला आहे. गेल्यावर्षी याच कालावधीत तो ३१.१६ टक्के होता.
महाराष्ट्र जलसंपदा विभागाच्या दैनंदिन अहवालानुसार, यंदा मान्सूनचे आगमन लांबल्यामुळे राज्यातील अनेक भागांत गेल्या वर्षीच्या तुलनेत पाण्याची उपलब्धता खूपच कमी आहे. राज्यातील एकूण ३,०२८ धरणे, बंधारे आणि जलाशयांमध्ये गुरुवारी एकूण ‘जिवंत’ पाणीसाठा २४.०३ टक्के आहे, तर गेल्यावर्षी १८ जून २०२५ रोजी हा साठा ३२.३८ टक्के नोंदवला गेला होता.
जलसंपदा विभागाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, साठ्याची ही आकडेवारी काहीशी दिशाभूल करणारी असू शकते. कारण, २०२५ मध्ये नैऋत्य मान्सून महाराष्ट्रात नेहमीपेक्षा लवकर म्हणजेच २८ मे रोजीच दाखल झाला होता. तसेच जूनच्या मध्यापर्यंत किनारपट्टी, पश्चिम महाराष्ट्र आणि मध्य महाराष्ट्राच्या काही भागांत मुसळधार पाऊस झाला होता. यंदा राज्यात मान्सून सक्रिय झालेला नाही. त्यामुळे राज्याच्या प्रत्येक भागात पाणीटंचाई जाणवत आहे. या पाणीटंचाईचा मोठा फटका शेतीला बसला आहे. त्यामुळे विविध महापालिकांनी पाणी कपात सुरू केली आहे. तसेच पाणी वाचवण्याच्या अनेक योजना राबवायला प्रारंभ केला आहे. शेतकऱ्यांनी सांगितल्याशिवाय पेरणी करू नये, असे आवाहन सरकारने केले आहे.
पूर्व महाराष्ट्रात परिस्थिती चांगली
नागपूर विभाग: नागपूर विभागात ६०.५१ अब्ज घनफूट जिवंत पाणीसाठा असून तो एकूण क्षमतेच्या ३६.३१ टक्के आहे. गेल्या वर्षी हा साठा ३२.२ अब्ज घटफूट होता.
अमरावती विभाग: अमरावती विभागात ५२.०४ अब्ज घनफूट उपयुक्त पाणी असून ते एकूण क्षमतेच्या ३७.५३ टक्के आहे. हे प्रमाण गेल्या वर्षीच्या ३७.९१ टक्क्यांपेक्षा किंचित कमी आहे.
सध्या संपूर्ण राज्यात मिळून एकूण जिवंत पाणीसाठा ३४६.८२ अब्ज घटफूट आहे.
प्रादेशिक पातळीवरील पाणीसाठ्याची स्थिती
पुणे विभाग: सध्या पुणे विभागात ७७.०२ अब्ज घनफूट जिवंत पाणीसाठा आहे.
नाशिक विभाग: ५२.४३ अब्ज घटफूट उपयुक्त पाणी शिल्लक आहे. जे एकूण क्षमतेच्या २४.९३ टक्के आहे. गेल्या वर्षी हेच प्रमाण ३१.७० टक्के होते.
छत्रपती संभाजीनगर विभाग: येथे ६६.८६ अब्ज घनफूट जिवंत साठा असून तो एकूण क्षमतेच्या २५.९३ टक्के आहे. गेल्या वर्षी हा साठा ३०.६८ टक्के होता.
कोकण विभाग: किनारपट्टीच्या कोकण विभागात ३७.९६ अब्ज घनफूट जिवंत पाणीसाठा आहे, जो एकूण साठ्याच्या २९.०१ टक्के आहे. गेल्या वर्षी हे प्रमाण ३६.१८ टक्के होते.
‘मृत साठा’ आणि ‘जिवंत साठा’ म्हणजे काय?
प्रत्येक धरणात काही प्रमाणात पाण्याचा साठा असतो. ज्याला ‘मृत साठा’ मानले जाते. हा साठा साधारणपणे कोणत्याही कारणासाठी वापरला जात नाही. या मृत साठ्याच्या वर जमा होणाऱ्या पाण्याला ‘जिवंत साठा’ मानले जाते.