पावसाचे संकट गहिरे; प्रशांत महासागरात १९५० नंतरचा सर्वाधिक शक्तिशाली ‘एल निनो’ सक्रिय, मान्सूनवर विपरीत परिणामाची शक्यता

येत्या २ ते ३ दिवसांत मान्सून महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा, आंध्र प्रदेश, छत्तीसगड आणि उर्वरित ओदिशा-बिहारमध्ये अधिक प्रगती करण्यासाठी अत्यंत अनुकूल परिस्थिती निर्माण झाली असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
पावसाचे संकट गहिरे; प्रशांत महासागरात १९५० नंतरचा सर्वाधिक शक्तिशाली ‘एल निनो’ सक्रिय,  मान्सूनवर विपरीत परिणामाची शक्यता
पावसाचे संकट गहिरे; प्रशांत महासागरात १९५० नंतरचा सर्वाधिक शक्तिशाली ‘एल निनो’ सक्रिय, मान्सूनवर विपरीत परिणामाची शक्यता'एआय' ने बनविलेली प्रातिनिधिक प्रतिमा
Published on

पुणे/नवी दिल्ली : येत्या २ ते ३ दिवसांत मान्सून महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा, आंध्र प्रदेश, छत्तीसगड आणि उर्वरित ओदिशा-बिहारमध्ये अधिक प्रगती करण्यासाठी अत्यंत अनुकूल परिस्थिती निर्माण झाली असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. दरम्यान, अमेरिकेची प्रख्यात हवामान संस्था 'नोआ' (NOAA) ने प्रशांत महासागरात एल निनो सक्रिय झाल्याची अधिकृत घोषणा केली आहे. शास्त्रज्ञांच्या मते, यंदाचा एल निनो हा १९५० नंतरचा सर्वात तीव्र ‘एल निनो’ असण्याची ६३ टक्के शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळेभारतातील मान्सूनवर त्याचा विपरीत परिणाम होण्याची दाट शक्यता वर्तविण्यात आली आहे.

कारण विषुववृत्तीय प्रशांत महासागरात ‘एल निनो’ची स्थिती निर्माण झाली आहे. ती पावसाळ्यात अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे, असे भारतीय हवामानशास्त्र विभागाने शुक्रवारी सांगितले. मान्सूनची वाटचाल मंदावण्यामागे ‘एल निनो’ची अप्रत्यक्ष भूमिका महत्त्वाची मानली जात आहे. ढगांचे क्षेत्र असलेला 'मॅडन ज्युलियन ऑसिलेशन' हा घटक हिंदी महासागराऐवजी प्रशांत महासागरातच सक्रिय राहिल्याने मान्सूनची प्रगती रोखली गेली आहे. तसेच आखाती देशांकडून येणाऱ्या कोरड्या वाऱ्यांनीही पावसाला रोखून धरले आहे.

यंदा पाऊस अनियमित स्वरूपाचा

मान्सूनने शुक्रवारी बंगालच्या उपसागराचा वायव्य भाग, तसेच पश्चिम बंगाल, बिहार, ओदिशा आणि झारखंडचा काही भाग व्यापला आहे. मान्सूनची उत्तर सीमा सध्या महाराष्ट्रातील हरणे आणि सोलापूरसह हैदराबाद, भद्राद्री कोठागुडेम, कलिंगपट्टणम, पारादीप, बारीपाडा, पुरुलिया, धनबाद आणि मुझफ्फरपूर या भागातून जात आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार, येत्या २ ते ३ दिवसांत मान्सून महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा, आंध्र प्रदेश, छत्तीसगड आणि उर्वरित ओदिशा-बिहारमध्ये अधिक प्रगती करण्यासाठी अत्यंत अनुकूल परिस्थिती निर्माण झाली आहे. मात्र प्रशांत महासागराच्या पृष्ठभागाचे तापमान सरासरीपेक्षा लक्षणीयरीत्या वाढल्यामुळे ही धोकादायक स्थिती उद्भवली आहे. याचा थेट आणि विपरीत परिणाम भारताच्या मान्सूनवर होण्याची दाट शक्यता असून, यंदा पाऊस सरासरीपेक्षा कमी किंवा अत्यंत अनियमित स्वरूपाचा राहू शकतो, ज्याचा मोठा फटका देशातील शेती व्यवसायाला बसण्याची चिन्हे आहेत.

पावसाचे संकट गहिरे; प्रशांत महासागरात १९५० नंतरचा सर्वाधिक शक्तिशाली ‘एल निनो’ सक्रिय,  मान्सूनवर विपरीत परिणामाची शक्यता
यंदाचा एल निनो तीव्र रूप धारण करणार; तो भयंकर आणि खर्चिक ठरण्याची शास्त्रज्ञांना भीती

अनियमित पावसाचा थेट शेतीला धोका

‘एल निनो’च्या या प्रभावामुळे भारतात पावसाचे प्रमाण सरासरीपेक्षा कमी किंवा अत्यंत अनियमित राहण्याचा धोका आहे, ज्याचा थेट फटका शेतीला आणि खरीप हंगामाला बसू शकतो. भारतीय हवामान विभागाने यंदा सरासरीच्या ९० टक्के पावसाचा अंदाज वर्तवला आहे, ज्यामध्ये ५ टक्के कमी-अधिक तफावत असू शकते. एल निनोमुळे पावसाच्या प्रादेशिक वितरणात मोठी विषमता निर्माण होते. ज्या भागात नैसर्गिकरित्या कमी पाऊस पडतो, तिथे पावसाचे प्रमाण अधिक घटल्यास दुष्काळी परिस्थिती निर्माण होऊ शकते.

प्रशांत महासागरातील तापमानात मोठी वाढ

हवामान खात्याने सांगितले की, विषुववृत्तीय प्रशांत महासागराच्या मोठ्या भागात महासागराच्या पृष्ठभागाखाली तापमानात लक्षणीय वाढ दिसून येत आहे. याचाच अर्थ आगामी महिन्यांत उबदार पाणी पृष्ठभागावर येत राहील आणि या स्थितीला अधिक मजबूत करेल. जून ते ऑगस्ट दरम्यान मध्य प्रशांत महासागरात पृष्ठभागाचे तापमान सरासरीपेक्षा जास्त राहील आणि जुलैपासून मध्य तसेच पूर्व प्रशांत महासागरात त्याचा विस्तार होऊन ते अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे. हवामान मॉडेलचे ताजे संकेत दर्शवतात की नैऋत्य मान्सूनच्या बहुतांश काळात मध्यम ते तीव्र स्वरूपाची ‘एल निनो’ स्थिती राहील.‘एल निनो’ ही एक नैसर्गिक हवामान पद्धती आहे, जी विषुववृत्तीय प्रशांत महासागरातील समुद्राच्या पृष्ठभागाचे तापमान नेहमीपेक्षा जास्त वाढण्याशी संबंधित आहे.

भारतासाठी ऐतिहासिकदृष्ट्या याचा संबंध कमकुवत मान्सून, वाढलेले तापमान, पावसाचा मोठा खंड आणि काही वर्षांमध्ये दुष्काळाचा वाढता धोका याच्याशी जोडला गेला आहे. यापूर्वी २०२३ मध्ये ‘एल निनो’ची स्थिती निर्माण झाली होती. तसेच २००० सालापासून विचार केला तर २००२, २००९ आणि २०१५ मध्ये अशा प्रकारची स्थिती उद्भवली होती.

सात धरणांत ११.७८ टक्के पाणीसाठा

मुंबई : मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही धरणात फक्त ११.७८ टक्के पाणीसाठा उपलब्ध असून २० जूनपर्यंत वरुणराजाचे आगमन लांबणीवर पडल्याने मुंबईवर पाणी संकट गडद होत चालले आहे. यंदा १२ जून रोजी सातही धरणात १ लाख ७० हजार ५४१ दशलक्ष लिटर पाणीसाठा आहे. तर राज्य सरकारकडून २ लाख ३० हजार ५०० मिलियन लिटर राखीव साठा उपलब्ध करण्यात आला आहे. धरणातील पाणीसाठ्यात घट अन् पावसाची ओढ यामुळे मुंबईत पाणीबाणी परिस्थिती ओढावू शकते. त्यामुळे मुंबईत पाणीबाणी परिस्थिती टाळण्यासाठी आतापासून उपाययोजना करण्यात येत आहेत.

logo
marathi.freepressjournal.in