

पुण्यात पुन्हा एकदा सासरच्या छळाला कंटाळून विवाहित तरुणीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आंबेगाव पठार परिसरात राहणारी स्नेहा विशाल झंडगे (वय २५) हिने राहत्या घरी गळफास घेऊन आपले जीवन संपवले. या प्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात सासरच्या सात जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, स्नेहाचे गेल्या वर्षी विशाल झंडगे याच्याशी लग्न झाले होते. लग्नानंतर स्नेहा हिला सासरच्या मंडळींकडून वारंवार शारीरिक तसेच मानसिक छळ सहन करावा लागत होता. तिला स्वयंपाक नीट जमत नाही, कंपनी काढायला २० लाख रुपये घरच्यांकडून घेऊन ये अशा सततच्या त्रासाला कंटाळून तिने आत्महत्या केल्याची फिर्याद स्नेहाचे वडिल कैलास मच्छिंद्र सावंत यांनी पोलिसांकडे दिली आहे.
तक्रारीनुसार, सततच्या छळामुळे स्नेहा नैराश्यात गेली आणि अखेर तिने गळफास घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणी तिचा पती विशाल झंडगे, सासरा संजय झंडगे, सासू विठाबाई झंडगे, दीर विनायक झंडगे, नणंद तेजश्री थिटे, नणंदेचा पती परमेश्वर थिटे आणि सासऱ्याचा साडू भाऊसाहेब कोल्हाळ यांच्याविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, लग्नाच्या वर्षभरातच स्नेहाला असे पाऊल उचलावे लागले यासाठी हळहळ व्यक्त होत आहे.