महाराष्ट्राच्या सांस्कृतिक राजधानी पुण्यात अनंत चतुर्दशीच्या दिवशी मानाच्या गणपतींच्या मिरवणुकीला पारंपरिक जल्लोषात सुरुवात झाली. सकाळपासूनच शहरात भक्तांची तुफान गर्दी उसळली होती. लक्ष्मी रोड, बेलबाग चौक, शुक्रवार पेठ, नाना पेठ या परिसरात केशरी ध्वजांनी सजलेले वातावरण, गुलालाची उधळण, ढोल-ताशांचा गजर आणि "गणपती बाप्पा मोरया"च्या घोषणांनी संपूर्ण शहर दुमदुमून गेले. मानाच्या पाचही गणपतींचे वेळेत विसर्जन पार पडले असून आता पुण्यातील सार्वजनिक आणि घरगुती गणपती विसर्जनाला सुरुवात झाली आहे.
मानाचा पहिला कसबा गणपती
पुण्याचा मानाचा पहिला गणपती कसबा गणपती सकाळी मिरवणुकीसाठी मार्गस्थ झाला. पारंपरिक वाद्यांच्या गजरात, फुलांनी सजवलेल्या रथातून बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची प्रचंड गर्दी झाली होती. दुपारी ३.४७ वाजता म्हणजे ६ तास १७ मिनिटांच्या मिरवणुकीनंतर बाप्पाचे विसर्जन पार पडले.
मानाचा दुसरा तांबडी जोगेश्वरी गणपती
मानाचा दुसरा तांबडी जोगेश्वरी गणपती भक्तांच्या जयघोषात ४.१० वाजता विसर्जनासाठी पोहोचला. या बाप्पाची मिरवणूक ६ तास ४० मिनिटे चालली. पारंपरिक लेझीम पथक, झांज पथक आणि ढोल-ताशांच्या गजराने मिरवणूक अधिकच देखणी झाली.
मानाचा तिसरा गुरुजी तालीम गणपती
गुरुजी तालीम मंडळाचा मानाचा तिसरा गणपती ४.३५ वाजता विसर्जनासाठी दाखल झाला. ७ तास ०५ मिनिटांच्या मिरवणुकीनंतर बाप्पाचे विसर्जन झाले. परिसरात उत्साह, आनंद आणि भक्तीचा माहोल दिसून आला.
मानाचा चौथा तुळशीबाग गणपती
पुण्यातील मानाचा चौथा तुळशीबाग गणपती दुपारी ४.५९ वाजता विसर्जन घाटावर पोहोचला. या बाप्पाची मिरवणूक तब्बल ७ तास २९ मिनिटे चालली. फुलांनी सजवलेले रथ, आकर्षक सजावट, आणि पारंपरिक वाद्यांच्या तालावर नाचणारे भाविक हे विसर्जन मिरवणुकीचे वैशिष्ट्य ठरले.
मानाचा पाचवा केसरीवाडा गणपती
मानाचा पाचवा केसरीवाडा गणपती संध्याकाळी ५.३९ वाजता विसर्जनासाठी पोहोचला. या बाप्पाची मिरवणूक ८ तास ०९ मिनिटे चालली. केसरीवाडा मंडळाने नेहमीप्रमाणे पारंपरिक भव्य मिरवणुकीचे आयोजन केले होते.
भक्तांचा उत्साह आणि सांस्कृतिक वारसा
पुण्यातील मानाच्या पाचही गणपतींच्या विसर्जनावेळी भाविकांचा उत्साह ओसंडून वाहत होता. पारंपरिक पोशाखातील पथके, लेझीम, ढोल-ताशांचा गजर आणि घोषणांनी शहरातील प्रत्येक गल्ली, चौक गणेशमय झाला होता.
भाविकांनी "गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या"च्या जयघोषात आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप दिला.