पुण्यात पुन्हा टोळीयुद्ध पेटले? रिक्षाचालकाची भर रस्त्यात हत्या

विद्येचे माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुण्यात पुन्हा एकदा गँगवॉरची घटना समोर आली आहे. कोंढवा परिसरात रिक्षाचालक गणेश काळे (वय ३५) याच्यावर काही अज्ञात व्यक्तींनी गोळ्या झाडून आणि कोयत्याने वार करत त्याचा खून केला.
पुण्यात पुन्हा टोळीयुद्ध पेटले? रिक्षाचालकाची भर रस्त्यात हत्या
Published on

विद्येचे माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुण्यात पुन्हा एकदा गँगवॉरची घटना समोर आली आहे. कोंढवा परिसरात रिक्षाचालक गणेश काळे (वय ३५) याच्यावर काही अज्ञात व्यक्तींनी गोळ्या झाडून आणि कोयत्याने वार करत त्याचा खून केला. हल्ल्यानंतर आरोपी फरार झाले असून, पोलिसांनी परिसरात नाकाबंदी केली आहे. प्राथमिक माहितीनुसार, ही हत्या आंदेकर-कोमकर टोळीयुद्धातून झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

गणेशची त्याच्याच रिक्षात हत्या करण्यात आली. त्याच्या संपूर्ण शरीरावर गोळ्या झाडल्यानंतर, त्याच्यावर कोयत्यानेही हल्ला करण्यात आला. प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, काळे मृत असल्याची खात्री करण्यासाठी हल्लेखोरांनी हे केले आणि नंतर ते पळून गेले. पुण्यात वाढत्या गँगवॉरने पुन्हा एकदा सुरक्षाव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत.

हत्या झालेला गणेश काळे हा समीर काळेचा भाऊ आहे. समीर काळे हा कोमकर गँगशी संबंधित असून वनराज आंदेकरच्या हत्येच्या प्रकरणात सध्या तुरुंगात आहे. त्यामुळे गणेश काळेची हत्या ही जुन्या वैरातून झाल्याची शक्यता तपासली जात आहे.

आंदेकर टोळी अद्याप सक्रिय?

गेल्या वर्षी माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांची नाना पेठ भागात गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. त्यानंतर बदला म्हणून आंदेकर टोळीने आयुष कोमकरचा खून केला होता. या प्रकरणात टोळीप्रमुख सूर्यकांत उर्फ बंडू आंदेकरसह अनेकांना अटक करण्यात आली होती. तरीदेखील आता गणेश काळेच्या हत्येमुळे आंदेकर टोळी अद्याप सक्रिय असल्याचे संकेत मिळत आहेत.

जुन्या वैरातून पुन्हा रक्तरंजित घटना

वनराज आंदेकरच्या हत्येनंतर आंदेकर गँगच्या सदस्यांनी बदला घेण्याची शपथ घेतली होती. त्यानंतर आयुष कोमकरचा खून झाला. आता गणेश काळेची हत्या होणे म्हणजे या दोन गँगमधील संघर्ष अजून संपलेला नाही, हे स्पष्ट होत आहे.

पोलिसांसमोर आव्हान वाढले

या साखळी हत्यांमुळे पुणे पोलिसांसमोर पुन्हा एकदा आव्हान उभे राहिले आहे. आंदेकर-कोमकर गँगवॉर रोखण्यासाठी पोलिसांनी कोंढवा, नाना पेठ आणि संबंधित परिसरात अतिरिक्त बंदोबस्त वाढवला आहे. सीसीटीव्ही फुटेज, मोबाईल लोकेशन्स आणि टोळ्यांच्या हालचालींचा तपास सुरू असून, लवकरच काही संशयितांना ताब्यात घेण्यात येण्याची शक्यता आहे.

logo
marathi.freepressjournal.in