

मुंबई : पुणे जिल्ह्यात स्वयंघोषित गोरक्षकांनी केलेल्या हल्ल्यानंतर दोन वर्षांहून अधिक काळ बेपत्ता असलेल्या पतीचा शोध घेण्यासाठी मुंबईतील रेश्मा रफिक तांबोळी या महिलेने उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. टेम्पोचालक असलेल्या पती रफिक मेहबूब तांबोळीचे अपहरण करण्यात आले व शिवशंकर स्वामी यांच्या नेतृत्वाखालील एका जमावाने बेदम मारहाण करून हत्या केली असावी, असा संशयही रेश्मा तांबोळीने याचिकेत व्यक्त केला आहे. या याचिकेची न्यायमूर्ती रवींद्र घुगे आणि न्यायमूर्ती गौतम अंखड यांच्या खंडपीठाने दखल घेत पोलिसांना भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश दिले.
पुण्याच्या रेश्मा तांबोळी हिच्यावतीने ज्येष्ठ वकील सतीश तळेकर यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. याचिकेची न्यायमूर्ती रवींद्र घुगे आणि न्यायमूर्ती गौतम अंखड यांच्या खंडपीठाने दखल घेतली.
४ जून २०२१ रोजी रात्री टेम्पोचालक रफीक तांबोळी आणि इम्रान शेख अब्दुल गफार नावाचा क्लिनर हे दोघे पुण्यातील इंदापूर येथून मुंबईच्या दिशेने मांस वाहतूक करीत होते. याचदरम्यान दौंडजवळ सफेद कारमधून आलेल्या काही लोकांनी टेम्पो अडवला आणि त्यांच्यावर गोमांसची बेकायदेशीरपणे वाहतूक केल्याचा आरोप केला. तसेच बांबूच्या काठ्या आणि धारदार शस्त्रांचा धाक दाखवून जमावाने दोघांना गाडीतून बाहेर काढले. त्यानंतर हल्ला केला आणि जातीयवाचक शिवीगाळ केली, असा युक्तिवाद अॅड. तळेकर यांनी याचिकाकर्त्या महिलेच्या वतीने केला. ही घटना घडल्यानंतर अखिल भारतीय जमातुल कुरेश समितीने शिवशंकर स्वामी आणि त्यांच्या सहकाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची विनंती करीत पोलीस अधिकाऱ्यांना अनेक निवेदने दिली. परंतु त्याआधारे पोलिसांनी कोणतीही कारवाई केलेली नाही, याकडेही ॲड. तळेकर यांनी लक्ष वेधले. याची दखल घेत खंडपीठाने याचिकेवर सुनावणी घेण्यास तयारी दर्शवली.
पोलिसांना भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश
न्यायमूर्ती घुगे यांच्या खंडपीठाने याचिकेतील मुद्द्यांची गांभीर्याने दखल घेतली आणि पोलिसांनी अद्याप या प्रकरणात ठोस कारवाई का केली नाही ? एफआयआर का दाखल केला नाही? असे सवाल खंडपीठाने केले आणि पोलिसांना भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश दिले. त्यावर अतिरिक्त सरकारी वकील कोंडे-देशमुख यांनी कथित प्रकरणाच्या तपासाची सर्व कागदपत्रे सोलापूर पोलिस अधीक्षकांसमोर सादर केली जातील आणि शिवशंकर स्वामी यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवायचा की नाही हे ते ठरवतील, अशी माहिती खंडपीठाला दिली. याप्रकरणी पुढील आठवड्यात सुनावणी होणार आहे.