पुण्यात हॉटेलमध्ये स्फोट; ९ कामगार होरपळले

दौंड–पाटस रोडवरील हॉटेल जगदंबा येथे बुधवारी अचानक गॅस सिलेंडरचा भीषण स्फोट झाल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. या दुर्घटनेत हॉटेलमध्ये काम करणारे नऊ कामगार होरपळल्याची प्राथमिक माहिती आहे.
पुण्यात हॉटेलमध्ये स्फोट; ९ कामगार होरपळले
छायाचित्र : एएनआय
Published on

पुणे : दौंड–पाटस रोडवरील हॉटेल जगदंबा येथे बुधवारी अचानक गॅस सिलेंडरचा भीषण स्फोट झाल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. या दुर्घटनेत हॉटेलमध्ये काम करणारे नऊ कामगार होरपळल्याची प्राथमिक माहिती आहे. स्फोट इतका मोठा होता की त्याचा आवाज दूरवर ऐकू गेला. काही क्षणातच हॉटेलमध्ये मोठ्या प्रमाणात आग पसरली.

नऊ जखमींपैकी तीन कामगारांना दौंड येथील एका खाजगी रुग्णालयात तर सहा कामगारांना पुणे येथे उपचारासाठी पाठविण्यात आले.

दुपारी एक वाजण्याच्या सुमारास हा स्फोट झाल्याची माहिती आहे. यावेळी हॉटेलमध्ये ग्राहक नव्हते. अन्यथा मोठा अनर्थ घडला असता. सिलेंडरचा स्फोट मोठा असल्याने हॉटेलच्या किचन मधील भांडी आणि अन्नपदार्थ सर्वत्र पसरले होते. सुमारे दहा ते अकरा सिलेंडर या किचनमध्ये होते. अचानक स्फोट झाला व हॉटेलवरचे पत्रे देखील उडून गेले. तर ग्राहकांच्या बैठक व्यवस्थेतील काचा खिडक्या तुटून बाहेर पडल्या. खुर्च्या, टेबलही उडाले. या हॉटेलमध्ये ग्राहकांची गर्दी असते. पण, सुदैवाने त्यावेळी ग्राहकांची गर्दी नसल्याने पुढील अनर्थ टळला आहे. मात्र, या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. घटनास्थळी पोलिसांनी पंचनामा केला असून याप्रकरणाचा अधिक तपास दौंड पोलिस करीत आहे. स्फोटामुळे हॉटेलमधील स्वयंपाकघराचे मोठे नुकसान झाले असून काही साहित्य जळून खाक झाले आहे.

logo
marathi.freepressjournal.in