राज्यात पुणेकरांची अवयवदानात बाजी; मुंबई, नागपूर, छत्रपती संभाजीनगरलाही टाकले मागे

पुणे शहराने २०२५ या वर्षात मरणोत्तर अवयवदानात संपूर्ण महाराष्ट्रात अग्रस्थान प्राप्त केले आहे. पुण्यातील झोनल ट्रान्सप्लांट को-ऑर्डिनेशन सेंटरने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या वर्षभरात राज्यात एकूण १५३ जणांचे मरणोत्तर अवयवदान झाले, त्यात पुण्यात ७९ मृतांच्या अवयवदानाचा यशस्वी समन्वय साधण्यात आला.
प्रातिनिधिक छायाचित्र
प्रातिनिधिक छायाचित्र
Published on

मुंबई : पुणे शहराने २०२५ या वर्षात मरणोत्तर अवयवदानात संपूर्ण महाराष्ट्रात अग्रस्थान प्राप्त केले आहे. पुण्यातील झोनल ट्रान्सप्लांट को-ऑर्डिनेशन सेंटरने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या वर्षभरात राज्यात एकूण १५३ जणांचे मरणोत्तर अवयवदान झाले, त्यात पुण्यात ७९ मृतांच्या अवयवदानाचा यशस्वी समन्वय साधण्यात आला. या दातृत्वामुळे तब्बल २०७ गंभीर रुग्णांना नवीन आयुष्य मिळाले आहे. पुणे विभागाने आघाडी घेत मुंबई, नागपूर, छात्रपती संभाजीनगरलाही मागे टाकले आहे.

राज्यात मुंबई, पुणे, नागपूर आणि छत्रपती संभाजीनगर या चार विभागीय प्रत्यारोपण समन्वय समित्या कार्यान्वित आहेत. गेल्या वर्षी पुणे विभागात सर्वाधिक ७९ जणांचे तर मुंबई विभाग ५३, नागपूर विभाग १६ आणि छत्रपती संभाजीनगर विभाग ५ असे मरणोत्तर अवयवदान झाले. पुणे विभागात पुण्यासह, कोल्हापूर, सांगली, सातारा, अहिल्यानगर, सोलापूर, नाशिक, धुळे आणि जळगाव या जिल्ह्यांचा समावेश आहे. पुण्यात झालेल्या २०७ प्रत्यारोपणामध्ये ११७ मूत्रपिंड, ६७ यकृत, १३ फुफ्फुसे आणि ४ हृदयांचा समावेश आहे.

अवयवदात्यांमध्ये ७२ टक्के पुरुष, २८ टक्के महिला

मेंदूमृत्यूची (ब्रेनडेड) कारणे पाहता २८ दात्यांचा मृत्यू अपघात किंवा इजा (ट्रॉमा) यामुळे झाला असून, ५१ दाते आजारपण किंवा इतर नॉन-ट्रॉमा कारणांमुळे मेंदूमृत झाले. एकूण अवयवदात्यांपैकी ७२ टक्के पुरुष (५७ दाते), तर २८ टक्के महिला (२२ दाते) आहेत. महिला दात्यांमध्ये ऑस्ट्रेलियाचे नागरिकत्व असलेल्या महिलेचा समावेश आहे. पुणे विभागातील मेंदूमृत अवयव दात्यांमध्ये अपघातातांमुळे मृत्यू झालेले २८ दाते असून, ५१ दाते आजारपणासह इतर कारणांमुळे मृत्यू झालेले आहेत, अशी माहिती पुणे विभागीय अवयव प्रत्यारोपण समितीच्या समन्वयक आरती गोखले यांनी दिली.

मूत्रपिंड प्रत्यारोपणांची संख्या सर्वाधिक

या प्रत्यारोपणांमध्ये मूत्रपिंड प्रत्यारोपणांची संख्या सर्वाधिक असून, त्यामुळे ११७ जणांना जीवनदान मिळाले आहे. त्या खालोखाल ६७ यकृत प्रत्यारोपण, १३ फुफ्फुस प्रत्यारोपण आणि चार हृदय प्रत्यारोपण करण्यात आले, तसेच हृदय आणि फुफ्फुस एकत्रित प्रत्यारोपण एक, मूत्रपिंड आणि हृदय प्रत्यारोपण एक, तसेच मूत्रपिंड आणि स्वादुपिंड यांचे एक प्रत्यारोपण झाले आहे.

देशात महाराष्ट्र चौथ्या क्रमांकावर

राज्यासह देशातही अवयवदानाबाबत जनजागृती वाढत असून त्यामुळे अनेक गंभीर रुग्णांना नवसंजीवनी मिळत आहे. देशातील मरणोत्तर अवयवदानांमध्ये महाराष्ट्राने चौथे स्थान प्राप्त केले आहे. सर्वाधिक मरणोत्तर अवयवदान तमिळनाडूमध्ये (२६७) झाले असून त्याखालोखाल तेलंगणा (२०५) आणि कर्नाटकने (१९८) स्थान प्राप्त केले आहे. महाराष्ट्र १५३ मरणोत्तर अवयवदानासह चौथ्या स्थानी असून गुजरातने (१५२) पाचवा क्रमांक पटकावला आहे.

logo
marathi.freepressjournal.in