गणेशोत्सव २०२५ मोठ्या उत्साहात साजरा करण्याची तयारी सुरू असताना पुणे जिल्हा प्रशासनाने कायदा-सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. २७ ऑगस्ट ते ६ सप्टेंबर या कालावधीत पुणे जिल्ह्यातील दारू विक्रीवर संपूर्ण बंदी (Pune Liquor Ban) राहणार आहे, असे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी जारी केले आहेत.
असा असेल आदेश
या काळात परवाना असलेली दारू दुकाने, बार, वाईन शॉप्स तसेच परवानाधारक विक्री केंद्रे बंद राहतील.
आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
खडक, विश्रामबाग आणि फारसखाना पोलीस स्टेशन हद्दीत गणेशोत्सवाच्या संपूर्ण कालावधीत दारूबंदी कडकपणे अंमलात येणार आहे.
गणपती आगमन आणि विसर्जन दिवशी संपूर्ण पुणे जिल्ह्यात दारूबंदी लागू असेल.
तसेच ५व्या व ७व्या दिवसाच्या विसर्जन मिरवणूक मार्गांवरील सर्व दारू दुकाने बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
दारूबंदी कशासाठी?
गणेशोत्सवाच्या काळात शहरात आणि ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असल्याने कायदा-सुव्यवस्था नियंत्रणात ठेवणे हे प्रशासनासाठी आव्हानात्मक ठरते. याच पार्श्वभूमीवर ही बंदी लागू करण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
कोकणवासीयांसाठी लालपरी सज्ज
पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात राहणारे अनेक कोकणवासीय दरवर्षी गणेशोत्सवाला गावी जातात. यंदाही मोठ्या संख्येने प्रवासी एसटीला प्राधान्य देत आहेत. प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, स्वारगेट आणि पिंपरी आगारातून २४ ते २६ ऑगस्टदरम्यान तब्बल १४१ बसेसचे ग्रुप बुकिंग झाले आहे. या बस रत्नागिरी, चिपळूण, दापोली, सावंतवाडी, देवगड, खेड आदी कोकणातील प्रमुख ठिकाणी धावतील. ज्यांनी ग्रुप बुकिंग केलेले नाही, त्यांच्यासाठी जादा बसची सोय करण्यात येणार असून मागणी वाढल्यास अधिक बसेस उपलब्ध करून देण्याची तयारी आहे.