महाराष्ट्र साहित्य परिषदेत वादंग; नांदी निधीचा हिशेब, घटनाभंग, अविश्वास ठराव कारणीभूत

शंभराव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या पूर्वतयारीसाठी नियोजित ९९ नांदी संमेलनांच्या शासकीय निधीचा हिशेब, आर्थिक अनियमितता, घटनाभंग आणि मुख्य पदाधिकाऱ्यांवरील अविश्वास ठराव यामुळे महाराष्ट्र साहित्य परिषदेत मोठा वादंग निर्माण झाला आहे.
महाराष्ट्र साहित्य परिषदेत वादंग; नांदी निधीचा हिशेब, घटनाभंग, अविश्वास ठराव कारणीभूत
महाराष्ट्र साहित्य परिषदेत वादंग; नांदी निधीचा हिशेब, घटनाभंग, अविश्वास ठराव कारणीभूत
Published on: 

पुणे : शंभराव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या पूर्वतयारीसाठी नियोजित ९९ नांदी संमेलनांच्या शासकीय निधीचा हिशेब, आर्थिक अनियमितता, घटनाभंग आणि मुख्य पदाधिकाऱ्यांवरील अविश्वास ठराव यामुळे महाराष्ट्र साहित्य परिषदेत मोठा वादंग निर्माण झाला आहे. कार्यकारी मंडळातील २१ सदस्यांनी अध्यक्ष योगेश सोमण, प्रमुख कार्यवाह डॉ. स्वाती महाळंक आणि कोषाध्यक्ष प्रदीप निफाडकर यांच्याविरोधात २७ ऑक्टोबर २०२६ रोजी अविश्वास ठराव दाखल केला आहे. तसेच निधीचा ताळेबंद, उपयोगिता प्रमाणपत्र तसेच संस्थेतील गैरकारभार याबाबत राज्य मराठी विकास संस्थेचे संचालक डॉ. शामकांत देवरे यांच्याकडे २१ नोव्हेंबर २०२६ रोजी पत्राद्वारे तक्रारही करण्यात आली आहे.

देशांतर्गत ९९ नांदी संमेलनांसाठी ५ कोटी आणि परदेशातील संमेलनांसाठी २ कोटी रुपये असा निधी राज्य शासनाकडून देण्याचे निश्चित झाले असून, त्यापैकी २ कोटी रुपयांचा निधी परिषदेस प्राप्त झाल्याचे ७ ऑक्टोबर २०२६ च्या पत्रातून स्पष्ट झाले आहे. १६ ऑगस्ट २०२६ च्या सभेत नांदी संमेलनांचा विषय मोघमपणे घेतल्याचा आणि निधी व खर्चाचा स्पष्ट उल्लेख नसल्याने सदस्यांना अंधारात ठेवल्याचा आरोप कार्यवाह सुनील महाजन व इतर सदस्यांनी केला आहे.

संस्थेच्या १२० वर्षांच्या परंपरेत प्रथमच घटनाभंग !

खर्चाचा आराखडा ठरवण्याची सूचना असतानाही साहित्य खरेदी, प्रवासखर्च व मानधनासाठी स्वतंत्र ठराव नोंदवण्यात आल्याचा आणि कार्यकारी मंडळाच्या मंजुरीविना खर्च करणे घटनाबाह्य असल्याचा दावा करण्यात आला आहे. २७ ऑक्टोबर २०२६ च्या अविश्वास ठरावात संस्थेच्या १२० वर्षांच्या परंपरेत पहिल्यांदाच घडलेल्या घटनाभंगाच्या बाबी नमूद करण्यात आल्या आहेत. बैठकांच्या सूचनांमध्ये चुकीचे उल्लेख करणे, पुणे व शहराबाहेरील सदस्यांत भेदभाव करणे, विभागीय कार्यवाह व संपादकांना डावलणे, तसेच लेखापरीक्षण अहवाल व वार्षिक सर्वसाधारण सभेसंदर्भातील नियमांचे उल्लंघन झाल्याचा आरोप आहे. ३१ ऑक्टोबर २०२६ च्या मुदतीत आयकर विवरणपत्र दाखल न होणे, पदाधिकाऱ्यांची रचना अपूर्ण ठेवणे, विश्वस्तांच्या नेमणुकीत दिरंगाई आणि कर्मचारी भरतीतील अनियमितता या मुद्द्यांवरून मुख्य पदाधिकाऱ्यांनी पदावरून मुक्त व्हावे, अशी मागणी करण्यात आली आहे.

स्वागताध्यक्षपदाची मागणी

मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांना १९ नोव्हेंबर २०२६ रोजी पाठविलेल्या पत्रात कार्यकारी मंडळातील सदस्यांनी शंभराव्या साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची निवड करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. घटनेनुसार १५ दिवसांत अविश्वास ठरावावर निर्णय घेण्याची तरतूद असतानाही दिशाभूल केली जात असल्याचा आरोप सदस्यांनी केला.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)