पुणे : मेट्रोने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी मोठी दिलासादायक बातमी आहे. पुणे मेट्रोच्या तिसऱ्या मार्गावर (मेट्रो लाइन ३) प्रवास अधिक सोपा आणि जलद करण्यासाठी अनेक आधुनिक तिकीट सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. व्हॉट्सॲपवरून QR तिकीट, UPI पेमेंट, नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड (NCMC), मोबाईल ॲप आणि तिकीट वेंडिंग मशीन अशा विविध पर्यायांमुळे प्रवाशांना रांगेत उभे राहण्याची गरज भासणार नाही.
व्हॉट्सॲपवरूनही मिळणार QR तिकीट
मेट्रो सेवा सुरू झाल्यानंतर प्रवाशांना थेट व्हॉट्सॲपद्वारे QR आधारित तिकीट काढता येणार आहे. त्यामुळे तिकीट काउंटरवर जाण्याची आवश्यकता राहणार नाही. याशिवाय पुणे मेट्रोच्या अधिकृत मोबाईल ॲपवरूनही तिकीट बुक करता येणार आहे.
सुरुवातीला ॲपमध्ये महा मेट्रोच्या लाइन १ आणि २ तसेच मेट्रो लाइन ३ साठी स्वतंत्र बुकिंगचा पर्याय असेल. मात्र, पुढे जिल्हा न्यायालय स्थानकावर तिन्ही मार्ग जोडले गेल्यानंतर एकाच ॲपमधून संपूर्ण मेट्रो नेटवर्कसाठी तिकीट बुक करता येणार आहे.
NCMC कार्डवरूनही करता येणार प्रवास
केंद्र सरकारच्या 'वन नेशन, वन कार्ड' उपक्रमांतर्गत नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड (NCMC) या मार्गावरही वापरता येणार आहे. या एकाच कार्डच्या मदतीने पुणे मेट्रोच्या लाइन १, २ आणि ३ तसेच देशातील इतर शहरांतील मेट्रो सेवांमध्येही प्रवास करता येणार आहे.
UPI, डेबिट कार्ड आणि कॅशनेही पेमेंटची सुविधा
प्रवाशांना तिकीट खरेदीसाठी UPI, डेबिट कार्ड, रोख रक्कम आणि इतर डिजिटल पेमेंट पर्याय उपलब्ध असतील. प्रत्येक स्थानकावर QR आणि कार्ड स्कॅनिंग यंत्रणा बसवण्यात येणार असून त्यामुळे प्रवेश आणि बाहेर पडण्याची प्रक्रिया अधिक जलद होणार आहे.
प्रत्येक स्थानकावर आधुनिक AFC प्रणाली
मेट्रो लाइन ३ वरील सर्व स्थानकांवर अत्याधुनिक ऑटोमॅटिक फेअर कलेक्शन (AFC) प्रणाली बसवण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यात सुरू होणाऱ्या १२ स्थानकांवर ही सुविधा उपलब्ध असेल. प्रत्येक स्थानकावर पाच AFC गेट्स असतील. त्यापैकी एक गेट दिव्यांग प्रवाशांसाठी विशेष रुंद ठेवण्यात आले आहे.
तिकीट वेंडिंग मशीन आणि काउंटरही उपलब्ध
डिजिटल सुविधांसोबतच पारंपरिक पद्धतीने तिकीट घेणाऱ्या प्रवाशांसाठी प्रत्येक स्थानकावर तिकीट वेंडिंग मशीन आणि मॅन्युअल तिकीट काउंटरची सुविधाही असणार आहे. दिव्यांग प्रवाशांना सहज वापरता यावे यासाठी तिकीट मशीन योग्य उंचीवर बसवण्यात आल्याची माहिती मेट्रो प्रशासनाने दिली आहे.
मेट्रो प्रशासनाच्या माहितीनुसार, हे संपूर्ण तिकीट व्यवस्थापन तंत्रज्ञान, सुलभता आणि प्रवाशांच्या सोयी लक्षात घेऊन तयार करण्यात आले असून, पुणे मेट्रोचा प्रवास अधिक वेगवान, सुरक्षित आणि त्रासमुक्त करण्याचा उद्देश आहे.