
पुण्यातील जुन्या कात्रज घाटात मंगळवारी (दि. १४) सकाळी पावणे नऊच्या सुमारास PMPML बस आणि दुचाकीचा भीषण अपघात झाला. या अपघातात दुचाकीवरील २ जणांचा जागीच मृत्यू झाला असून १ तरुणी गंभीर जखमी झाली आहे.
आंबेगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कात्रज आगाराची कात्रज-सारोळा-कात्रज मार्गावरील PMPML बस ससेवाडीहून पुण्याकडे येत होती. त्याच दिशेने एक दुचाकी येत होती. दुचाकीवर एक तरुण आणि दोन तरुणी प्रवास करत होत्या. या दरम्यान भिलारेवाडी वळणावर बसने दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती, की दुचाकीवरील दोघांचा जागीच मृत्यू झाला.
या अपघातात आकाश रामदास गोगावले (वय २९, रा. ससेवाडी, ता. भोर) आणि अनुष्का प्रकाश वाडकर (वय २७) या दोघांचा जागीच मृत्यू झाला. तर, नेहा कैलास गोगावले (वय २०, रा. ससेवाडी) ही तरुणी गंभीर जखमी असून तिच्यावर भारती हॉस्पिटल येथे उपचार सुरू आहेत.
अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले आणि पोलिसांना माहिती दिली. आंबेगाव पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवले. दरम्यान, पोलिसांनी PMPML बसचालक सुधीर दिलीप कोंडे (वय ४२, रा. आर्वी, पुणे) याला ताब्यात घेतले असून त्याला वैद्यकीय तपासणीसाठी पाठवण्यात आले आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
अपघातामुळे काही तास कात्रज घाट मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. मात्र, भारती विद्यापीठ वाहतूक विभाग आणि आंबेगाव पोलिसांनी मिळून वाहतूक सुरळीत केली. हा अपघात भरधाव वेगामुळे झाला, की निष्काळजीपणामुळे याचा तपास सुरू आहे.