Pune : ध्वनिमर्यादेचे ५०० हून अधिक गणेश मंडळांकडून उल्लंघन? MPCB चा अहवाल गुलदस्त्यात

पुण्यात नुकत्याच पार पडलेल्या गणेशोत्सवाच्या विसर्जन सोहळ्यात ५०० हून अधिक गणेशोत्सव मंडळांनी ध्वनिमर्यादेचे उल्लंघन केल्याची बाब समोर आल्याचा दावा करण्यात येत आहे.
सरसकट बंदी नको, आवाजाची मर्यादा आखून द्या; पुण्यातील तरुणांनी सुचवला उपाय
सरसकट बंदी नको, आवाजाची मर्यादा आखून द्या; पुण्यातील तरुणांनी सुचवला उपायप्रातिनिधिक छायाचित्र
Published on: 

पुणे : पुण्यात नुकत्याच पार पडलेल्या गणेशोत्सवाच्या विसर्जन सोहळ्यात ५०० हून अधिक गणेशोत्सव मंडळांनी ध्वनिमर्यादेचे उल्लंघन केल्याची बाब समोर आल्याचा दावा करण्यात येत आहे. उत्सवादरम्यान ध्वनीच्या तीव्रतेवर लक्ष ठेवण्यासाठी आणि मोजणी करण्यासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने (एमपीसीबी) सुमारे अडीच कोटी रुपये खर्च केले. मात्र, या मोजणीचा सविस्तर अहवाल अद्याप सार्वजनिक करण्यात आलेला नसल्याचा आरोप ‘लाऊडस्पीकरविरोधी पुणेकर मंचा’ने केला आहे. न्यायालयाच्या निर्देशांनंतरही अहवाल प्रसिद्ध करण्यास विलंब होत असल्याने प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

यंदा ध्वनीचे मोजमाप करण्यासाठी एमपीसीबीने ‘महाबळ एन्व्हायरमेंटल इंजिनिअर्स प्रायव्हेट लिमिटेड’ या खासगी कंपनीची नियुक्ती केली होती. या कंपनीने शहरातील प्रमुख १५ चौकांसह सुमारे २०० गणेश मंडळांच्या परिसरात ध्वनीची मोजणी केली. या तपासणीत मोजणी केलेल्या सर्व २०० ठिकाणी निर्धारित ध्वनिमर्यादेचे उल्लंघन झाल्याचे आढळल्याचा दावा करण्यात आला आहे.

सरासरी पातळी सुमारे १०४.५ डेसिबल

ध्वनी नियमांचे उल्लंघन झाल्याचे समोर येऊनही संबंधित मंडळांवर कायदेशीर अथवा दंडात्मक कारवाई करण्यात आलेली नसल्याचा आरोप मंचाने केला आहे. पोलीस विभागानेही स्वतंत्रपणे ध्वनिपातळीची मोजणी केली होती; मात्र, त्यासंबंधीची माहितीही अद्याप सार्वजनिक करण्यात आलेली नसल्याचे मंचाचे प्रतिनिधी मुकुंद किर्दत यांनी सांगितले. दरम्यान, ‘कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे’ (सीओईपी) या संस्थेने गणेशोत्सवातील ध्वनी प्रदूषणाचा अभ्यास अहवाल प्रसिद्ध केला होता. या अहवालानुसार, शहरातील विविध भागांत ध्वनीची सरासरी पातळी सुमारे १०४.५ डेसिबल नोंदविण्यात आली होती.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in