अवघ्या काही दिवसांवर सर्वांचा आवडता दिवाळी सण आला आहे. सर्वजण आतुरतेने या सणाची वाट पाहत आहेत. अशातच पुणे पोलिसांनी शहरातील फटाक्यांच्या विक्री आणि वापराबाबत कडक नियम जारी केले आहेत. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी जारी केलेल्या परिपत्रकानुसार, नागरिकांनी सण आनंदाने आणि जबाबदारीने साजरा करावा, अन्यथा कायदेशीर कारवाई होणार आहे. सणासुदीच्या काळात होणारे अपघात, आग आणि वाढते वायू व ध्वनी प्रदूषण टाळण्यासाठी हे नियम लागू करण्यात आले आहेत.
फटाक्यांची विक्री फक्त 'या' तारखांपर्यंतच
फटाक्यांची विक्री यंदा १० ऑक्टोबर ते २४ ऑक्टोबर या कालावधीतच तात्पुरत्या परवान्यांद्वारे करता येणार आहे. या कालावधीनंतर कोणालाही फटाके विकणे किंवा साठवणे परवानगीशिवाय करता येणार नाही. न विकलेला साठा परवानाधारक गोदामात किंवा अधिकृत घाऊक विक्रेत्याकडे परत करावा लागेल.
फटाके वाजवण्याची वेळ
सकाळी ६ ते रात्री १० वाजेपर्यंतच फटाके वाजवण्यास परवानगी असेल.
रात्री १० नंतर ते सकाळी ६ या वेळेत फटाके वाजवण्यास पूर्णपणे बंदी आहे.
आवाज आणि प्रदूषण मर्यादा
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, ४ मीटर अंतरावर १२५ डेसिबलपेक्षा जास्त आवाज करणारे फटाके वाजवण्यास बंदी आहे.
‘ॲटमबॉम्ब’सारखे अतिशय मोठ्या आवाजाचे फटाके विक्रीस, साठवणुकीस आणि वापरास पूर्ण मनाई करण्यात आली आहे.
शांतता क्षेत्रात पूर्ण बंदी
रुग्णालये, शाळा, महाविद्यालये आणि न्यायालयांपासून १०० मीटरच्या परिसरात कोणत्याही प्रकारचे फटाके वाजवणे प्रतिबंधित आहे.
सार्वजनिक ठिकाणी बंदी
महामार्ग, पूल, रस्ते आणि सार्वजनिक स्थळांवर फटाके फोडणे किंवा रॉकेट्स उडवण्यावर बंदी करण्यात आली आहे. या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल. याशिवाय, पेट्रोलियम आणि स्फोटक सुरक्षा संघटना (PESO) २०१५ नुसार, आयात केलेल्या फटाक्यांची विक्री किंवा वापर करण्यास मनाई आहे.
पुणे पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, दिवाळीचा आनंद घेताना इतरांच्या सुरक्षिततेची आणि आरोग्याची काळजी घ्यावी. नियम तोडला, तर कारवाई टळणार नाही, असा स्पष्ट इशारा पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिला आहे.