

पुणे : व्हिसाची मुदत संपल्यानंतरही पुण्यात बेकायदा वास्तव्य करणाऱ्या १९ परदेशी महिलांचा शोध घेण्यात आला असून, त्यांच्या हद्दपारीची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे, अशी माहिती पोलिसांनी रविवारी दिली.
पुण्यात व्हिसाची मुदत संपल्यानंतरही वास्तव्य करणाऱ्या परदेशी नागरिकांबाबत माहिती मिळाल्यानंतर पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी विशेष शाखेला कारवाईचे निर्देश दिले होते. त्यानुसार, विशेष शाखेचे उपायुक्त डॉ. प्रशांत अमृतकर यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकांनी २० नोव्हेंबर रोजी कोरेगाव पार्क, मांजरी आणि मुंढवा परिसरात तपासणी केली.
या कारवाईदरम्यान, व्हिसाच्या अटी आणि नियमांचे उल्लंघन करून भारतात वास्तव्य करणाऱ्या १९ परदेशी महिलांचा शोध लागला. या महिलांना हद्दपार करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.