पुण्यातील हिट अँड रन प्रकरणात आरोपीच्या आजोबांना अटक

पुण्यातील कल्याणीनगर भागात झालेल्या ‘हिट अँड रन’ प्रकरणात पोलिसांनी दोन गुन्हे दाखल केल्यानंतर आता आणखी एक गुन्हा दाखल केला आहे.
पुण्यातील हिट अँड रन प्रकरणात आरोपीच्या आजोबांना अटक

पुणे : पुण्यातील कल्याणीनगर भागात झालेल्या ‘हिट अँड रन’ प्रकरणात पोलिसांनी दोन गुन्हे दाखल केल्यानंतर आता आणखी एक गुन्हा दाखल केला आहे. अपघातग्रस्त कारमधील चालकावर दबाव टाकून संबंधित कार अपघातावेळी अल्पवयीन मुलगा नाही तर तूच चालवत होतास असा जबाब पोलिसांना दे. असे सांगत त्याचा मोबाईल फोन काढून घेत त्याला घरात डांबून ठेवल्याचा प्रकार पोलीस चौकशीत उघडकीस आला आहे. त्यानंतर पोलिसांनी याप्रकरणी अगरवाल यांचा कारचालक गंगाधर पुजारी याच्या तक्रारीनुसार मुलाचे आजोबा व वडील यांच्यावर भादंवि कलम ३६५, ३६८ नुसार गुन्हा दाखल केला आहे. तसेच अल्पवयीन मुलाच्या आजोबाला देखील पोलीसांकडून अटक करण्यात आली आहे. सुरेंद्रकुमार अगरवाल (वय ७४) असे अटक करण्यात आलेल्या आजोबांचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी मध्यरात्री अडीच वाजण्याच्या सुमारास हा भीषण कार अपघात झाला. यावेळी मोटारीत आरोपी अल्पवयीन मुलगा, कारचालक, मुलाचे दोन मित्र असे चारजण होते. कारचालक पुजारी मोटारीत पुढील सीटवर बसलेला होता. अपघात झाल्यानंतर अल्पवयीन मुलासह चौघांना पोलीस ठाण्यात नेले. त्यावेळी अगरवाल कुटुंब येरवडा पोलीस ठाण्यात आले. त्यांनी चालक गंगाधर पुजारी यांना तूच मोटार चालवत होतास असे पोलिसांना सांग, असे अगरवाल पिता-पुत्रांनी सांगितले. दरम्यान, पोलिसांच्या तपासात गाडीचा चालक बदलण्याचा प्रयत्न झाला असल्याची माहिती तपासात समोर आली आहे, असे पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी सांगितले होते. या तपासात चालक गंगाधर याला मुलाचे वडील विशाल अगरवाल आणि आजोबा सुरेंद्रकुमार यांनी तूच गाडी चालवत होता, असे सांगण्यासाठी दबाव आणला. पुजारी यांना एक मौल्यवान बक्षीस भेट देतो, असे सांगून घरी नेले. त्यानंतर त्यांचा मोबाईल काढून घेतला आणि त्यांना डांबून ठेवले. तूच गाडी चालवत होतास, अशी कबुली दे, असे म्हणून दोघांनी त्याच्यावर जबरदस्तीने दबाव आणला होता, असे तपासात उघड झाले. पोलिसांनी चालक पुजारी यांच्याकडे चौकशी केल्यानंतर हा प्रकार समोर आला आहे. त्यानंतर पोलिसांनी त्यांची तक्रार दाखल करून घेतली. आजोबा सुरेंद्रकुमार यांना अटक करण्यात आली आहे. बांधकाम व्यावसायिक विशाल अगरवाल याला शुक्रवारी चौदा दिवस न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले होते; परंतु आता नवीन गुन्हा त्याच्यावर दाखल झाल्याने पुन्हा त्याचा ताबा पोलीस घेऊन त्यास न्यायालयात हजर करून पोलीस कोठडी मागणार आहे.

तपास गुन्हे शाखेकडे वर्ग

कल्याणीनगर भागातील अपघात प्रकरणानंतर मोठ्या प्रमाणात संताप व्यक्त होत असताना या प्रकरणाचा तपास येरवडा पोलिसांकडून पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेकडे सोपविण्यात आला आहे. येरवडा पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षकासह सहाय्यक निरीक्षक विश्वनाथ तोडकरी व पोलीस निरीक्षक राहुल जगदाळे यांना निलंबित करण्याचे आदेश पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिले. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली अतिरिक्त पोलीस आयुक्त शैलेश बलकवडे, पोलीस उपायुक्त अमोल झेंडे, सहाय्यक आयुक्त सुनील तांबे या प्रकरणाचा तपास करणार आहेत.

logo
marathi.freepressjournal.in