
पुण्यातील खराडी परिसरातील एका उच्चभ्रू सोसायटीमध्ये सुरु असलेल्या रेव्ह पार्टीवर शनिवारी रात्री (२६ जुलै) पोलिसांनी छापा टाकत मोठी कारवाई केली आहे. या कारवाईदरम्यान प्रांजल खेवलकर यांना अटक करण्यात आली असून, ते राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते एकनाथ खडसे यांचे जावई आणि महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांचे पती आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हाऊस पार्टीच्या नावाखाली सुरू असलेल्या या रेव्ह पार्टीमध्ये अंमली पदार्थांचे सेवन, हुक्का आणि दारूचा वापर केला जात होता. या पार्टीत प्रांजल खेवलकरसह तीन महिला आणि दोन पुरुष सहभागी असल्याचेही समोर आले आहे. पोलिसांनी सर्वांना ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली आहे. यासंदर्भात विविध कायद्यांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रोहिणी खडसे यांच्या पुण्यातील घरावर छापा
पुण्यातील खराडी भागात सुरू असलेली रेव्ह पार्टी उधळल्यानंतर पुणे पोलिसांच्या पथकाने रोहिणी खडसे आणि प्रांजल खेवलकर यांच्या पुण्यातील घरावर छापा टाकला. या छाप्यादरम्यान पोलिसांनी संपूर्ण घराची झाडाझडती घेतली. तपासादरम्यान पोलिसांच्या हाती एक लॅपटॉप, तीन पेन ड्राइव्ह आणि एक हार्ड डिस्क लागली. या तिन्ही वस्तू पोलिसांनी ताब्यात घेतल्या असून, त्यांचा तपास सुरू आहे.
कारवाई झालीच पाहिजे - एकनाथ खडसे
या घटनेनंतर एकनाथ खडसे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, मी सध्या या प्रकरणातील सर्व माहिती गोळा करत आहे. सविस्तर तपास व फॉरेन्सिक रिपोर्ट आल्यानंतरच यावर अधिक बोलू शकतो. जर कोणी दोषी असेल, जावई असो वा इतर कोणी, तर त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे. पण कोणाला अडकवण्याचा प्रयत्न होत असेल, तर ते सहन केलं जाणार नाही.
ही राजकीय सूडभावना - विद्या चव्हाण
या प्रकरणावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवक्त्या विद्या चव्हाण यांनी प्रतिक्रिया देत म्हटले, सध्या सरकारविरोधात बोलणाऱ्यांना थेट नडता येत नाही, त्यामुळे त्यांच्या कुटुंबीयांना लक्ष्य केलं जात आहे, असा गंभीर आरोप त्यांनी केला आहे. त्या पुढे म्हणाल्या, रोहिणी खडसे या पक्षात असून सरकारविरोधात ठामपणे बोलत आहेत. त्यामुळे त्यांच्या पतीला लक्ष्य केलं जात आहे. ही राजकीय सूडभावना आहे. सत्य काय आहे ते पोलीस तपासातून समोर येईल, पण मला यात स्पष्ट राजकीय अँगल दिसतो.
सध्या या घटनेचा पोलिसांकडून तपास सुरू आहे. अंमली पदार्थांचं प्रमाण, प्रकार व सेवनाबाबत फॉरेन्सिक तपासणी केली जात आहे.