
पुण्यातील सरकारी ससून जनरल हॉस्पिटलमधला संतापजनक प्रकार पुन्हा एकदा समोर आला आहे. हॉस्पिटलच्या निष्काळजीपणामुळे कातकरी आदिवासी तरुणाचा उपचाराअभावी तडफडून मृत्यू झाला आहे. तब्बल दोन तास रुग्णालयाच्या जमिनीवर वेदनेने विव्हळत या तरुणाचा मृत्यू झाला.
FPJ ने दिलेल्या वृत्तानुसार, मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव अनिल वाघमारे (वय २७) आहे. तब्बल दोन तास रुग्णालयाच्या जमिनीवर पडूनही त्याला वेळेत उपचार मिळाले नाहीत, असा गंभीर आरोप मृताच्या कुटुंबीयांनी केला आहे.
प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार, अनिल वाघमारेला तीव्र वेदना होत होत्या. तरीही वैद्यकीय कर्मचारी मदतीला धावून आले नाहीत. उपचाराअभावी त्यांनी आईसमोरच प्राण सोडले.
मृताची आई विमल हनुमंत वाघमारे म्हणाल्या, "माझा मुलगा खडकवासला येथील एका खाजगी दवाखान्यात उपचार घेत होता. डॉक्टरांनी सांगितले होते की त्याला जास्त दारूच्या सेवनामुळे डायलिसिस करावे लागेल. म्हणून आम्ही त्याला ससून रुग्णालयात आणले. पण, येथे कोणतीही मदत मिळाली नाही. माझ्या मुलाला असह्य वेदना होत होत्या आणि तो माझ्या डोळ्यांसमोर मरण पावला. हे पाहणे माझ्यासाठी असह्य होतं."
दरम्यान, ससून रुग्णालय प्रशासनाने अद्याप या प्रकरणावर कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही.