

पुणे : पुण्यातील शिवाजीनगर परिसरातील जिल्हा न्यायालयाबाहेर बुधवारी (दि. २५) भरदुपारी धक्कादायक घटना घडली. पाच ते सहा जणांच्या टोळक्याने मंदार किवळे या तरुणावर कोयत्याने हल्ला केला. त्याच्यावर गोळीबार करण्याचाही प्रयत्न झाल्याची माहिती समोर आली आहे. या हल्ल्यात मंदार गंभीर जखमी झाला असून, त्याचे दोन्ही हात छाटल्याची माहिती मिळत आहे. २०२५ मध्ये कात्रज परिसरात झालेल्या शुभम चव्हाण हत्या प्रकरणातील मंदार हा आरोपी आहे. न्यायालयाबाहेरच हा प्रकार घडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.
न्यायालयाच्या प्रवेशद्वाराजवळ हल्ला
शिवाजीनगर येथील पुणे जिल्हा व सत्र न्यायालयाच्या प्रवेशद्वार क्रमांक ४ जवळ, चेंबर क्रमांक ६३ च्या बाहेर ही घटना घडली. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, पाच ते सहा जण दोन दुचाकींवरून तेथे आले होते. त्यांच्याकडे कोयत्यासारखी धारदार शस्त्रे होती. काही कामानिमित्त न्यायालयात आलेल्या मंदार किवळे याच्यावर हल्लेखोरांनी अचानक हल्ला केला.
आधी गोळीबार, नंतर कोयत्याने वार
मिळालेल्या माहितीनुसार, हल्लेखोरांनी आधी मंदारवर गोळीबार केला आणि त्यानंतर कोयत्याने सपासप वार केले. या हल्ल्यात त्याचे दोन्ही हात छाटल्याची माहिती समोर येत आहे. मात्र, गोळीबार प्रत्यक्ष झाला की त्याचा प्रयत्न करण्यात आला, याबाबत वेगवेगळे दावे समोर आले आहेत. पोलिसांकडून या घटनेची पडताळणी केली जात आहे.
हल्लेखोरांनी दिली धमकी
माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, हल्लेखोरांनी आपण 'कात्रजचे भाई' असल्याचे ओरडून सांगितले. तसेच मंदार किवळे याला गंभीर परिणाम भोगण्याची धमकी दिली. त्यानंतर हल्लेखोर घटनास्थळावरून पळून गेले.
पोलिसांकडून सीसीटीव्ही फुटेजची तपासणी
घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकारी, गुन्हे शाखेची पथके आणि स्थानिक पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पुरावे गोळा करण्यासाठी न्यायवैद्यक पथकालाही बोलावण्यात आले. हल्लेखोरांची ओळख पटवण्यासाठी न्यायालयाच्या आवारातील तसेच परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहे. हल्ल्यामागील नेमके कारण काय, याचाही पोलीस शोध घेत आहेत.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यालय आणि पुणे मेट्रोचे कार्यालय यांच्यापासून काही मीटर अंतरावर हा हल्ला झाल्याने परिसरातील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.
सुप्रिया सुळेंकडून पुण्यातील कायदा-सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह
पुणे जिल्हा न्यायालयाबाहेर झालेल्या हल्ल्याच्या घटनेवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी संताप व्यक्त केला आहे. त्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'एक्स'वर पोस्ट करत पुण्यातील ढासळत्या कायदा-सुव्यवस्थेवर प्रश्न उपस्थित केले.
विद्येचे माहेरघर आणि सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुण्याची ओळख आता गुन्हेगारी आणि दहशतीचे शहर अशी होत चालल्याचे त्यांनी म्हटले आहे.
न्यायालयासारख्या संवेदनशील ठिकाणी, पोलीस चौकी आणि सुरक्षा व्यवस्था असतानाही भरदिवसा गोळीबार आणि कोयत्याने हल्ला होणे ही गंभीर बाब असल्याचे सुळे यांनी नमूद केले. पुण्यातील वाढत्या गुन्हेगारीबाबत चिंता व्यक्त करत त्यांनी पुणे पोलीस आयुक्त आणि राज्याच्या गृहखात्याने या प्रकरणातील सर्व आरोपींना तातडीने अटक करून कठोर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.