

नववर्षाच्या स्वागतासाठी शहरात मोठ्या प्रमाणात गर्दी होण्याची शक्यता आहे. हीच गोष्ट लक्षात घेऊन पुणे पोलिसांनी बुधवारी (दि.३१) सायंकाळी ५ वाजल्यानंतर शहरातील प्रमुख भागांमध्ये विशेष वाहतूक बदल लागू केले आहेत.
वाहतूक शाखेचे उपायुक्त हिंमत जाधव यांनी सांगितले की, नववर्ष सेलिब्रेशनदरम्यान मद्यप्राशन करून वाहन चालवणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल. तसेच, रात्री १२ वाजेपर्यंत जड वाहनांना शहरात प्रवेश बंदी घालण्यात आली आहे. लष्कर, डेक्कन जिमखाना, फर्ग्युसन रस्ता, जंगली महाराज रस्ता आणि महात्मा गांधी रस्ता परिसरात मोठ्या प्रमाणात जल्लोष होण्याची शक्यता असल्याने या भागांतील वाहतूक मर्यादित किंवा वळवण्यात येणार आहे.
फर्ग्युसन रस्ता व जंगली महाराज रस्त्यावरील वाहतूक बदल
• कोथरूड व कर्वे रस्त्याकडून येणारी वाहतूक खंडुजीबाबा चौकात थांबवून विधी महाविद्यालय रस्ता - प्रभात रस्ता - अलका चौक मार्गे वळवली जाईल.
• झाशीची राणी लक्ष्मीबाई चौकातून जंगली महाराज रस्त्यावर जाणारी वाहतूक बंद राहील
वाहने गोखले स्मारक चौक - पुणे महापालिका भवन - ओंकारेश्वर मंदिर - छत्रपती शिवाजी महाराज रस्ता मार्गे वळवली जातील.
• वाय जंक्शनकडून महात्मा गांधी रस्त्याकडे जाणारी वाहतूक १५ ऑगस्ट चौकात बंद करून
ती कुरेशी मशीद - सुजाता मस्तानी चौक मार्गे वळवली जाईल.
• इस्कॉन मंदिराकडून महात्मा गांधी रस्त्याकडे सायंकाळी ५ नंतर वाहनांना प्रवेश नाही.
• गोखले स्मारक चौक ते फर्ग्युसन महाविद्यालय प्रवेशद्वार दरम्यान वाहतूक पूर्णपणे बंद
(ही बंदी पहाटे ५ वाजेपर्यंत लागू)
• बाबासाहेब आंबेडकर रस्ता – अरोरा टॉवर्स – व्होल्गा चौक मार्ग बंद असणार आहे तर
वाहतूक ईस्ट स्ट्रीटमार्गे इंदिरा गांधी चौकाकडे वळवली जाईल.
• इंदिरा गांधी चौक ते महावीर चौक वाहतूक बंद राहून वाहने लष्कर पोलीस ठाण्याच्या दिशेने वळवली जातील.
पोलिस प्रशासनाने नागरिकांना वाहतूक नियमांचे पालन करण्याचे आणि सुरक्षित पद्धतीने नववर्षाचे स्वागत करण्याचे आवाहन केले आहे. अनावश्यक वाहन वापर टाळून सार्वजनिक वाहतुकीचा वापर करण्याचा सल्लाही देण्यात आला आहे.