Pune : खर्च भागेना म्हणून स्वतःच्याच अपहरणाचा बनाव! रडतानाचा VIDEO पाठवून कुटुंबीयांकडून मागितले ५ लाख

पुण्यात १९ वर्षीय तरुणाने खर्चासाठी पैसे मिळवण्यासाठी स्वतःच्याच अपहरणाचा बनाव रचला. कुटुंबाला रडतानाचा व्हिडीओ पाठवून ५ लाखांची मागणी केली; पोलिसांनी काही तासांतच बिंग फोडलं.
Pune : खर्च भागेना म्हणून स्वतःच्याच अपहरणाचा बनाव! रडतानाचा VIDEO पाठवून कुटुंबीयांकडून मागितले ५ लाख
'एआय'ने बनविलेली प्रातिनिधिक प्रतिमा
Published on

पुणे : खर्च भागत नव्हता, हातात कामही नव्हते आणि घरून मिळणारे पैसे अपुरे पडत होते... यातून पैसे मिळवण्यासाठी एका १९ वर्षीय तरुणाने अशी शक्कल लढवली की त्याच्या कुटुंबीयांसह दोन राज्यांतील पोलिसांचीही धावपळ उडाली. स्वतःचे अपहरण झाल्याचा बनाव करत तरुणाने रडतानाचा व्हिडीओ कुटुंबीयांना पाठवला आणि सुटकेसाठी तब्बल ५ लाख रुपयांची मागणी केली. मात्र, मोबाईल लोकेशनच्या आधारे पुणे पोलिसांनी शोध घेतला असता कथित अपहरण झालेला तरुण खडकीतील एका लॉजमध्ये सुखरूप आढळला आणि काही तासांतच संपूर्ण बनाव उघडकीस आला.

या तरुणाचे नाव ओम प्रकाश गौरीशंकर (१९) असून, तो मूळचा उत्तर प्रदेशातील रहिवासी आहे.

नेमकं काय घडलं?

ओम प्रकाश काही कारणास्तव पुण्यात आला होता. पुण्यात राहत असताना त्याच्याकडे नियमित काम नसल्याने तो आर्थिक अडचणीत सापडल्याची माहिती आहे. दैनंदिन खर्चासाठी तो घरातून पैसे मागत होता. मात्र, मिळणाऱ्या पैशांत खर्च भागत नसल्याने आणखी पैसे मिळवण्यासाठी त्याने स्वतःच्याच अपहरणाचा बनाव रचल्याचे पोलीस चौकशीत समोर आले.

Pune : खर्च भागेना म्हणून स्वतःच्याच अपहरणाचा बनाव! रडतानाचा VIDEO पाठवून कुटुंबीयांकडून मागितले ५ लाख
महिलेचे फोटो काढले, जाब विचारला तर पिस्तूल रोखली; दिल्ली मेट्रोत गोंधळ, CISF जवान निलंबित

ढसाढसा रडतानाचा VIDEO पाठवला

कुटुंबीयांना आपले खरोखरच अपहरण झाल्याचा विश्वास बसावा यासाठी ओम प्रकाशने स्वतःचा एक व्हिडीओ तयार केला. या व्हिडीओमध्ये तो रडताना दिसत होता. आपण पुण्यात अपहरणकर्त्यांच्या ताब्यात असून, सुखरूप सुटका हवी असल्यास ५ लाख रुपये द्यावे लागतील, असा संदेश त्याने मोठ्या भावासह कुटुंबीयांपर्यंत पोहोचवल्याची माहिती आहे.

व्हिडीओ पाहिल्यानंतर कुटुंबीय घाबरले. मुलगा खरोखरच अपहरणकर्त्यांच्या तावडीत असल्याचा त्यांचा समज झाला.

उत्तर प्रदेशातून पुणे पोलिसांना माहिती

कुटुंबीयांनी या प्रकरणाची माहिती उत्तर प्रदेशातील पोलिसांना दिली. त्यानंतर उत्तर प्रदेश पोलिसांनी पुणे पोलिसांशी संपर्क साधून एका १९ वर्षीय तरुणाचे पुण्यात अपहरण झाल्याचे आणि त्याच्या सुटकेसाठी ५ लाख रुपयांची खंडणी मागितली जात असल्याची माहिती दिली.

प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेत पुणे पोलिसांनीही तातडीने तपासाची चक्रे फिरवली.

मध्यरात्रीच सुरू झाली शोधमोहीम

१७ ऑगस्टच्या मध्यरात्रीपासून पुणे पोलिसांनी तरुणाचा शोध घेण्यास सुरुवात केली. रात्रीच्या गस्तीवर असलेले पोलीस उपायुक्त, सहायक पोलीस आयुक्त, पोलीस निरीक्षक तसेच विविध पोलीस ठाण्यांतील अधिकारी आणि कर्मचारी या शोधमोहिमेत सहभागी झाले.

उत्तर प्रदेश पोलिसांकडून ओम प्रकाशचा मोबाईल क्रमांक मिळाल्यानंतर त्याचे लोकेशन शोधण्याचे काम सुरू करण्यात आले.

मोबाईल लोकेशनमुळे लागला ठाव

तांत्रिक तपासात संबंधित मोबाईलचे लोकेशन पुण्यातील खडकी परिसरात असल्याचे समोर आले. त्यानंतर बंडगार्डन पोलिसांसह रात्रीच्या गस्तीवरील अधिकारी आणि मार्शल खडकी परिसरात पोहोचले. मोबाईलच्या लोकेशनच्या आधारे पोलिसांनी परिसरातील क्राउन प्लाझा लॉजिंग येथे तपासणी केली. मात्र, तिथे पोहोचल्यानंतर पोलिसांसमोर वेगळेच चित्र होते.

अपहरणकर्ते कुठेच नाहीत; उलट 'तो' तरुण लॉजमध्ये आरामात

ज्या तरुणाची सुटका करण्यासाठी पोलीस यंत्रणा रात्रीपासून धावपळ करत होती, तोच ओम प्रकाश लॉजमध्ये सुखरूप आणि आरामात बसलेला आढळला. तिथे कोणतेही कथित अपहरणकर्ते नव्हते.यामुळे पोलिसांचा संशय बळावला. त्याची सखोल चौकशी केल्यानंतर त्यानेच कुटुंबीयांना अपहरण झाल्याचा व्हिडीओ पाठवल्याचे आणि पैसे मिळवण्यासाठी हा सगळा बनाव केल्याचे कबूल केल्याची माहिती आहे.

Pune : खर्च भागेना म्हणून स्वतःच्याच अपहरणाचा बनाव! रडतानाचा VIDEO पाठवून कुटुंबीयांकडून मागितले ५ लाख
Nalasopara : वाढदिवसाच्या केकमध्ये मृत पाल? चिमुकल्यांसह ११ जण रुग्णालयात, परिसरात खळबळ

५ लाखांसाठी रचलेला बनाव काही तासांत उघड

काम नसल्याने खर्च भागत नव्हता आणि घरून आणखी पैसे मिळवण्यासाठी स्वतःच्याच अपहरणाची कल्पना सुचल्याचे चौकशीत समोर आले. त्यासाठी कुटुंबीयांना घाबरवण्यासाठी व्हिडीओ तयार करून ५ लाख रुपयांची मागणी करण्यात आली.

मात्र, उत्तर प्रदेश आणि पुणे पोलिसांच्या समन्वयातून मोबाईल लोकेशनचा माग काढण्यात आला आणि काही तासांतच कथित अपहरणामागचे वास्तव उघड झाले.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in