Ahilyanagar : राहुरीचे आमदार शिवाजीराव कर्डिले यांचे निधन

राहुरी विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे विद्यमान आमदार शिवाजीराव कर्डिले यांचे आज अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या निधनाने अहिल्यानगर जिल्ह्याच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.
Ahilyanagar : राहुरीचे आमदार शिवाजीराव कर्डिले यांचे निधन
Published on

राहुरी विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे विद्यमान आमदार शिवाजीराव कर्डिले यांचे आज अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या निधनाने अहिल्यानगर जिल्ह्याच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. कर्डिले हे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांचे सासरे होते.

राजकारणातील दमदार आणि जमिनीशी नाळ जपणारे नेते म्हणून ओळखले जाणारे कर्डिले यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात ग्रामपातळीवर केली होती. सरपंच पदावरून त्यांनी राजकीय प्रवासाला सुरुवात केली आणि पुढे राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही सक्रिय भूमिका बजावली.

२००९ साली त्यांनी भाजपच्या तिकिटावरून प्रथमच विधानसभा निवडणूक लढवली आणि विजय मिळवला. त्यानंतर २०१४ साली पुन्हा राहुरी मतदारसंघातून विजयी होत त्यांनी सलग दुसऱ्यांदा विधानसभेत प्रवेश केला. या काळात त्यांनी मतदारसंघात विविध विकासकामे राबवली आणि स्थानिक पातळीवर मजबूत जनाधार तयार केला.

मात्र, २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्राजक्त तनपुरे यांनी कर्डिले यांना पराभूत केले आणि त्यांच्या विजयाच्या हॅटट्रिकला अडथळा आणला. मात्र, २०२४ च्या निवडणुकीत त्यांनी पुन्हा ताकदीनं पुनरागमन करत तनपुरेंना पराभूत करत विजय मिळवला. आमदार, राज्यमंत्री, अहिल्यानगर जिल्हा बँकेचे चेअरमन अशा विविध पदांवर त्यांनी कार्य केले.

राहुरी परिसरात लोकप्रिय आणि कार्यकर्त्यांमध्ये प्रेमाने 'शिवाजीराव' म्हणून ओळखले जाणारे कर्डिले यांनी साधेपणा आणि जनसंपर्कावर भर दिला होता. त्यांच्या निधनाची बातमी समजताच राहुरी आणि नगर परिसरात शोककळा पसरली आहे. राजकीय, सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे.

logo
marathi.freepressjournal.in