

रायगड : खेळता खेळता फुगा घशात अडकल्याने श्वास घेण्यास त्रास होणाऱ्या २० महिन्यांच्या चिमुकल्याला उपचारासाठी रुग्णालयात नेले जात होते. मात्र, अलिबाग-बेलकडे मार्गावरील वाहतूककोंडीत रुग्णवाहिका तब्बल दीड ते दोन तास अडकून पडली. रुग्णवाहिकेचा सायरन वाजत होता, आई-वडील मुलाला वाचवण्यासाठी आक्रोश करत होते, पण मार्ग मिळत नसल्याने रुग्णालयात पोहोचण्यास उशीर झाला. अखेर चिमुकल्याने आईच्या कुशीतच जीव सोडला. रुग्णालयात पोहोचल्यावर डॉक्टरांनी चिमुकल्या आरांश ठाकूर याला मृत घोषित केले. या हृदयद्रावक घटनेमुळे रायगड जिल्ह्यात हळहळ व्यक्त होत असून, रस्त्याच्या कामादरम्यान वाहतुकीचे नियोजन नसल्याचा आरोप करत ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला आहे.
खेळताना फुगा घशात अडकला अन् श्वास घेण्यास त्रास
मिळालेल्या माहितीनुसार, अलिबाग तालुक्यातील बामणगाव येथे सुशील ठाकूर हे भाजी विक्रीचा व्यवसाय करतात. त्यांचा धाकटा मुलगा आरांश सोमवारी (दि. १६) दुपारी घराच्या अंगणात खेळत होता. याचवेळी खेळता खेळता त्याने फुगा गिळला. हा फुगा घशात अडकल्याने त्याला श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. मुलाची अवस्था पाहून आई-वडिलांची घाबरगुंडी उडाली. त्यांनी तातडीने रुग्णवाहिका बोलावली आणि आरांशला अलिबाग जिल्हा सामान्य रुग्णालयात नेण्याचा निर्णय घेतला.
'माझ्या लेकराचा श्वास कोंडतोय, कोणीतरी रस्ता द्या हो...
अलिबाग-बेलकडे मार्गावर सुरू असलेल्या रस्त्याच्या कामामुळे मोठी वाहतूककोंडी झाली होती. याच कोंडीत आरांशला घेऊन जाणारी रुग्णवाहिकाही तब्बल दीड ते दोन तास अडकून पडली. रुग्णवाहिकेचा सायरन वाजत होता, मात्र वाहनांना बाजूला होऊन रस्ता देणे शक्य होत नव्हते. अशा परिस्थितीत 'माझ्या लेकराचा श्वास कोंडतोय, कोणीतरी रस्ता द्या हो...' असा हृदय पिळवटून टाकणारा आक्रोश आरांशचे आई-वडील रुग्णवाहिकेतून करत होते. मात्र, त्यांचा आक्रोश ऐकूनही रुग्णवाहिकेला वेळेत मार्ग मिळू शकला नाही. अखेर रुग्णालयात पोहोचल्यावर डॉक्टरांनी आरांशला मृत घोषित केले. वेळेत वैद्यकीय उपचार मिळाले असते तर परिस्थिती वेगळी असती का, असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.
मृतदेह घेऊन जातानाही वाहतूककोंडीचा सामना
या घटनेतील आणखी एक धक्कादायक बाब म्हणजे आरांशचा मृतदेह घरी घेऊन जातानाही कुटुंबीयांना वाहतूककोंडीचा सामना करावा लागला. रुग्णालयातून बामणगावला परतताना दोन तासांहून अधिक वेळ लागल्याचे सांगण्यात येत आहे. एका बाजूला चिमुकल्याला गमावल्याचे दुःख आणि दुसरीकडे प्रवासात झालेला विलंब यामुळे कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
ग्रामस्थांकडून कारवाईसह आर्थिक मदतीची मागणी
या घटनेनंतर बामणगावसह अलिबाग परिसरात संताप व्यक्त केला जात आहे. रस्त्याचे काम सुरू असताना वाहतुकीचे योग्य नियोजन का करण्यात आले नाही? आपत्कालीन परिस्थितीत रुग्णवाहिकेला मार्ग मिळावा, यासाठी पर्यायी व्यवस्था का नव्हती? असे प्रश्न ग्रामस्थांकडून उपस्थित केले जात आहेत. विकासकामांदरम्यान रुग्णवाहिका आणि इतर आपत्कालीन वाहनांना अडथळा निर्माण होणार नाही, याची काळजी घेणे प्रशासन आणि संबंधित ठेकेदारांची जबाबदारी आहे.
दरम्यान, या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करावी आणि संबंधित ठेकेदारांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. शेतकरी कामगार पक्षानेही या प्रकरणी आक्रमक भूमिका घेतली असून, संबंधितांवर कारवाई करण्यासोबतच आरांशच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत देण्याची मागणी केली आहे.
या दुर्दैवी घटनेमुळे एका कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. तसेच रस्त्यांची कामे करताना आपत्कालीन वाहतुकीसाठी पर्यायी व्यवस्था उपलब्ध करून देण्याची गरज पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.