

रायगड जिल्ह्यातील खोपोली नगरपरिषदेच्या नवनिर्वाचित नगरसेविका मानसी काळोखे यांचे पती मंगेश काळोखे यांची शुक्रवारी (दि.२६) हत्या करण्यात आली. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. नगरपालिका निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर काही दिवसांतच घडलेल्या या घटनेचा संताप व्यक्त केला जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे आणि त्यांच्या समर्थकांनी ही हत्या केल्याचा आरोप शिवसेनेकडून करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे यांनी काळोखे कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले.
आपण काळोखे कुटुंबीयांच्या पाठीशी
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेत सांत्वन केले. यावेळी आरोपींवर कठोरात कठोर कारवाई करत त्यांना फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी काळोखे कुटुंबीयांनी केली. त्यावर, "आपण काळोखे कुटुंबीयांच्या पाठीशी उभे असून दोषींना कोणत्याही परिस्थितीत सोडणार नाही," असे एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले.
एकनाथ शिंदेंना पाहताच काळोखे कुटुंबीय भावुक झाले. "आरोपींवर मोक्का लावून त्यांना फाशीची शिक्षा द्यावी," अशी ठाम मागणी त्यांनी केली.
अशा वृत्तीला फाशीवर लटकवायला हवं...
यावेळी बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले, “मी काळोखे कुटुंबीयांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. जनतेने निवडून दिलेल्यांविरोधात सूडबुद्धीने राजकारण करण्यात आले आहे. अशी घटना पुन्हा घडू नये. हा नियोजित कटाचा भाग आहे. मोक्का अंतर्गत कारवाई करण्याची मागणी कुटुंबीयांनी केली आहे. अशा वृत्तीला फाशीवर लटकवायला हवं, कठोर शिक्षा व्हायला हवी."
पुढे ते म्हणाले, "या प्रकरणाकडे माझे लक्ष आहे. दोषींना सोडले जाणार नाही, आरोपींना ठेचून काढले जाईल." दरम्यान, या प्रकरणात दुर्लक्ष करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याला तात्काळ निलंबित करण्याची मागणीही यावेळी एकनाथ शिंदे यांच्याकडे करण्यात आली. संबंधित पोलीस अधिकारी सचिन हिरे यांच्यावर कारवाई व्हावी, अशी मागणी कुटुंबीयांनी केली.
१० जणांविरोधात गुन्हा दाखल
या प्रकरणात पोलिसांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे, रवींद्र देवकर, दर्शन देवकर यांच्यासह एकूण १० जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. मुख्य आरोपी रवींद्र देवकर आणि त्यांचा मुलगा दर्शन देवकर यांना अटक करण्यात आली आहे.
तटकरेंवर गंभीर आरोप
या हत्येनंतर शिंदे गटाचे आमदार महेंद्र थोरवे यांनी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यावर गंभीर आरोप केले. रायगडमध्ये तटकरे हेच सर्वेसर्वा असून त्यांच्या इशाऱ्यावर रक्तरंजित राजकारण सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला.
जे बोलले जात आहे ते तथ्यहीन
"खोपोलीतील घटना अत्यंत निंदनीय असून या घटनेचा निषेध व्यक्त करत तपास यंत्रणांनी शीर्घगतीने तपास करून आरोपींना अटक करावी अशी मागणी करतानाच इतर बाबतीत जे बोलले जात आहे ते तथ्यहीन आहे," असे सुनिल तटकरे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.
मुख्य आरोपी ताब्यात
या हत्या प्रकरणात खोपोली, नवी मुंबई, मुंबई एअरपोर्टसह रायगड जिल्ह्यातील विविध भागांत शोधमोहीम राबवण्यात आली. शनिवारी सकाळी नागोठणे परिसरात पोलिसांनी आरोपी रवींद्र देवकर आणि त्यांचा मुलगा दर्शन देवकर या आरोपींची गाडी अडवून त्यांना अटक केले.