
शिवसेना (ठाकरे गट) आणि मनसे या दोन प्रमुख मराठी पक्षांच्या वतीने आज वरळी येथे एकत्रित विजयी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. हिंदी सक्ती आणि त्रिभाषा सूत्राविरोधातील दोन शासकीय आदेश रद्द केल्याबद्दल हा मेळावा आयोजित करण्यात आला होता. वरळी येथे हा भव्य सोहळा पार पडला. या कार्यक्रमात आपल्या ठाकरे शैलीतून राज ठाकरे यांनी उपस्थितांना संबोधित केलं. यावेळी त्यांनी आज मोर्चा निघायला हवा होता अशी खंत व्यक्त केली. मराठी माणसाची ताकद, ठाकरे बंधूचं एकत्र येणं, मुलांचे इंग्रजी शाळेत शिकणं, त्रिभाषा सूत्र कशासाठी? यावर सडेतोड भाषण केलं.
मैदान ओसंडून वाहिलं असतं -
भाषणाच्या सुरुवातीलाच राज ठाकरे यांनी 'सन्माननीय उद्धव ठाकरे' म्हणत उपस्थितांची मनं जिंकली. पुढे राज ठाकरे म्हणाले, ''खरं तर आज मोर्चा निघायला हवा होता. मराठी माणूस कसा एकवटतो याचं चित्र मोठ्या प्रमाणावरती उभं राहिलं असतं. पण, नुसत्या मोर्चाच्या चर्चेनेच माघार घ्यावी लागली. खरंतर आजचाही मेळावा शिवतीर्थावरती मैदानात व्हायला हवा होता. मैदान ओसंडून वाहिलं असतं. पण पाऊस आहे. अशा प्रकारच्या जागा मिळत नाहीत मुंबईमध्ये. म्हणून तुम्हा सर्वांना इथे यावं लागलं. बाहेर जे उभे आहेत त्यांना मी दिलगिरी व्यक्त करतो. त्यांना आतमध्ये यायला नाही मिळालं. ''
पुढे ते म्हणाले, ''मी एका मुलाखतीत म्हंटलं होतं, जिथून या सगळया गोष्टी सुरू झाल्या. कोणत्याही वादापेक्षा आणि भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. आज जवळपास २० वर्षांनंतर मी आणि उद्धव एका व्यासपीठावर येत आहोत. जे माननीय बाळासाहेबांना जमलं नाही, जे अनेकांना जमलं नाही, आम्हा दोघांना एकत्र आणायचं ते ते देवेंद्र फडणवीसांना जमलं. आता बरेच चॅनलचे कॅमेरे सगळीकडे लागलेत. सगळं सुरू होईल आता. काय वाटतं काय दोघांची बॉडी लँग्वेज कशी होती? कोणी कमी हसलं का? जास्त हसलं का? कोणी बोलतायत का? आपल्याकडे मूळ विषय सोडून इतर गोष्टीतच अनेकांना रस असतो.
मराठी हाच 'अजेंडा -
खरं तर आजच्या मेळाव्याला कोणाचाही झेंडा नाही. मराठी हाच 'अजेंडा माझ्या मराठीकडे-महाराष्ट्रकडे वेड्यावाकड्या नजरेने पाहायचं नाही कुणी. हा प्रश्न आलाच नव्हता. काही गरजच नव्हती. हे कुठून अचानक आलं काही कळलं नाही मला. आणि हिंदी कशासाठी? कोणासाठी हिंदी? त्या लहान लहान मुलांवर जबरदस्ती करताय तुम्ही? कोणाला विचारायचं नाही शिक्षण तज्ञाना काही विचारायचं नाही. आमच्या हातात सत्ता आहे आम्ही ती लादणार. तुमच्या हातात सत्ता असेल ती विधानभवनात. आमच्याकडे सत्ता आहे रस्त्यावर.
महाराष्ट्र जेव्हा पेटून उठतो तेव्हा काय घडतं? -
''एक पत्र लिहिलं, दोन पत्र लिहिलं, नंतर ते दादा भुसे माझ्याकडे आले, मला म्हणाले आम्ही काय म्हणतोय एवढं समजून घ्या, ऐकून घ्या, दादा तुम्हाला सांगतो तुम्ही काय सांगताय ते ऐकून घेईन पण ऐकणार नाही. कुठलं त्रिभाषा सूत्र आणलं. आलं ते फक्त केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्यातील दुव्यासाठी त्रिभाषा सूत्र फक्त आणलं. कोर्टात, हाय कोर्टात, सुप्रीम कोर्टात जा कुठे आहे त्रिभाषा सूत्र? फक्त इंग्रजीचा वापर होतो. केंद्राच्या शिक्षण धोरणात नाही, इतर कोणत्याही राज्यातही नाही. महाराष्ट्रात प्रयोग करून पाहिला त्यांनी. दक्षिणेतील राज्य हिंग लावून विचारत नाहीत, महाराष्ट्र जेव्हा पेटून उठतो तेव्हा काय घडतं, हे राज्यकर्त्यांना समजलं असेल , त्याशिवाय का माघार घेतली, असं राज ठाकरे म्हणाले.
''विनाकरण आणलेला विषय होता. मी भुसे यांना विचारलं मध्य प्रदेश राजस्थान बिहार कोणती तिसरी भाषा आणणार आहात? खरं तर आणली पाहिजे. गंमत बघा हिंदी भाषिक राज्य आहेत ती आर्थिक दृष्ट्या मागास आणि हिंदी न बोलणारी राज्य आहे ती आर्थिकदृष्ट्या प्रगत आणि वरून आम्ही हिंदी शिकायचं. यांना हिंदीतून राज्य नाही सांभाळता आली, राज्याचा विकास नाही करता आला, हिंदी बोलत नाही ज्या राज्यांमध्ये हिंदी बोलत असलेल्या राज्यांमधून नोकरी धंद्यासाठी लोकं इकडे येत आहेत. आणि हे म्हणतात हिंदी शिका. कोणासाठी शिकायचं? हिंदी भाषेबद्दल मला वाईट नाही वाटत. भाषा कोणतीही असो ती श्रेष्ठच असते.'' असे राज ठाकरे म्हणाले.
मुंबई स्वतंत्र करता येते का?
राज ठाकरे यांनी अचानक त्रिभाषा सूत्र आणण्यामागे सरकारच्या उद्देशाकडे सूचित करताना म्हंटले, की ''यांनी फक्त चाचपडून पाहिलं. मुंबई स्वतंत्र करता येते का? यासाठी भाषेला डिवचून बघू. महाराष्ट्र शांत राहिला तर पुढे 'ते' पाऊल टाकू. कोणाची माय व्यायली त्याने महाराष्ट्राला, मुंबईला हात घालून दाखवावं. काय मजाक वाटला काय? आम्ही शांत आहोत याचा अर्थ गांडु नाही आहोत.'' असा इशारा राज ठाकरे यांनी सरकारला दिला.
अमित शहा यांच्यावर निशाणा -
ते पुढे म्हणाले, की ''अमित शाह म्हणाले होते, ज्याला इंग्रजी येते त्याला लाज वाटेल, अरे तुम्हाला येत नाही. या संपूर्ण हिंद प्रांतावर सव्वाशे वर्ष मराठ्यांनी राज्य केलं. इतक्या राज्यांवरती आम्ही राज्य केलं. आम्ही मराठी लादली? गुजरात, मध्यप्रदेश, पंजाबवर, अटकपर्यंत आम्ही लादली? हिंदी भाषा दोनशे वर्षांपूर्वीची भाषा आहे. महाराजांच्या काळात पण नव्हती. कशासाठी आणि कोणासाठी काय करायचंय नेमकं'' असा सवाल राज ठाकरे यांनी केला.
ठाकरेंची मुले इंग्रजी माध्यमांमध्ये शिकली -
"मग आता माघार घेतली त्याचं काय करायचं? मग सगळं प्रकरण वेगळीकडे वळवा. वेगळ्या ठिकाणी म्हणजे कुठे? तर ठाकरेंची मुले इंग्रजी माध्यमांमध्ये शिकली. म्हणजे दादा भुसे मराठी माध्यमात शिकून शिक्षणमंत्री झाले. देवेंद्र फडणवीस इंग्रजी माध्यमात शिकून मुख्यमंत्री झाले. कोण कुठे शिकलं याचा काय संबंध? कोणाकोणाची मुले परदेशात शिकत आहेत त्याच्या याद्या आमच्याकडे आहेत. त्याचं तुम्ही काय करणार आहात? त्यापेक्षा मंत्रिमंडळातील एका एका मंत्र्याचं हिंदी ऐका, फेफरं येईल. हे असले प्रश्न महाराष्ट्रातच विचारले जातात." आम्ही मराठी मीडियममध्ये शिकलो. आमची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकली, होय. मग यांना मराठीचा एवढा पुळका का आला? असा सवाल विचारणाऱ्यांना माझा प्रतिप्रश्न आहे बाळासाहेब ठाकरे आणि श्रीकांत ठाकरे हे दोघंही इंग्रजी माध्यमातून शिकलेले होते. त्यांच्यावर कोणीही मराठी प्रेमावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत नाही. मग आज आम्ही इंग्रजी माध्यमात शिकवतो म्हणून आमच्या मराठीपणावर संशय घेतला जातो. लालकृष्ण अडवाणी हे सेंट पॅट्रीक हायस्कूलमध्ये शिकले, त्यांच्या हिंदुत्वावर शंका घेणार आहात का?" असा सवाल त्यांनी केला.
विनाकारण उठसूट कोणालाही मारामारी करायची गरज नाही -
राज ठाकरे म्हणाले, "मी पुन्हा एकदा सांगतोय, अजून काहीच केलेले नाही. त्यांना मराठी भाषा बोलता आली पाहिजे यात काहीच वाद नाही. परंतु, विनाकारण उठसूट कोणालाही मारामारी करायची गरज नाही. कोणी जास्त नाटकं केली तर त्याच्या कानाखाली आवाज काढलाच पाहिजे. पण, चूक त्यांची असली पाहिजे. एक गोष्ट लक्षात ठेवाल अशी कोणतीही गोष्ट केली तर त्याचे व्हिडिओ काढू नका. त्यांच्या त्यांच्यातच कळलं पाहिजे. मारणारा कधी सांगत नसतो. मार खाणारा सांगतो, 'मला मारलं, मला मारलं', त्यांचं त्यांना सांगू देत, याचा अर्थ असा नाही की उठसूट कोणालाही मारायचं. अनेक लोकं आहेत. माझे मित्र आहेत गुजराती. नयन शाह म्हणून त्यांना मी गुजराठी म्हणतो. तुमचा विश्वास बसणार नाही इतका अप्रतिम मराठी तर बोलतोच विनोदाचाही अंग आहे. शिवाजी पार्कमध्ये कानाला हेडफोन लावून पु. ल. देशपांडे ऐकणारा गुजराती आहे.
मराठीचं बाळकडू -
मराठीचं बाळकडू आमच्यासाठी ते बाळकडूच होतं. मी मागे सांगितलं होतं आमच्या धमन्यांमध्ये हे आलं कुठून? मी महाराष्ट्रासाठी मराठीसाठी इतका कडवट का झालो? लहानपणापासूनचे अनेक प्रसंग आहेत मा. बाळासाहेबांबरोबरचे. पण मी एक प्रसंग कधीही विसरणार नाही. तो १९९९ सालचा आहे. शिवसेना भारतीय जनता पक्षाची युती सुरू होती. सरकार येणार नाही येणार नाही अशी परिस्थिती होती. पवार साहेबांनी राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्ष स्थापन केला होता. वेगवेगळे लढले होते. त्या वादामध्ये काहीच होईना. एके दिवशी मी मातोश्रीला खाली बसलो होतो. अचानक दोन गाड्या लागल्या. ३.३० - ४ वाजता जावडेकर ही मंडळी आली. ते म्हणाले राज बाळसाहेबांना भेटायचं आहे. मी म्हंटलं ते भेटणार नाही त्यांची झोपायची वेळ आहे. ते म्हणाले अर्जंट आहे. विषय काय आहे? त्यांना सांगा मुख्यमंत्री पदाचा विषय झाला आहे. सुरेश दादा जैन यांना मुख्यमंत्री करायचं दोन्ही बाजूने विषय झाला आहे. मी रूममध्ये गेलो. गाढ झोपले होते. मी म्हंटलं ए काका उठ तर बोलले काय रे? तर म्हंटलं ही सगळी मंडळी खाली आली आहेत. ते म्हणतात मुख्यमंत्री पदाचा विषय झाला आहे. सुरेश दादा जैन यांना मुख्यमंत्री करायचं. तर त्यांनी माझ्याकडे बघितलं आणि म्हंटले, 'त्यांना जाऊन सांग महाराष्ट्राचा मुख्यमंत्री मराठीच होईल दूसरा कोणी होणार नाही.' मराठी या एका विषयासाठी या माणसाने सत्तेवर लाथ मारली. हे संस्कार ज्या मुलावरती झालेले असतील. तो मराठीसाठी तडजोड करेल का?
बाळासाहेब ठाकरे यांचं स्वप्न पुन्हा एकदा साकारावं -
राज ठाकरे यांनी शेवटी म्हंटले, की ''बाकी सर्व युत्या, आघाड्या बाकी सगळ्या गोष्टी होत राहतील. महाराष्ट्र, मराठी माणूस, मराठी भाषा यावर तडजोड होणार नाही. कोणत्याही परिस्थितीत होणार नाही. याच्या पुढेही तुम्ही सर्वांनी सावध असणं आणि सतर्क असणं गरजेचे आहे. पुढे काही गोष्टी घडतील, होतील, त्याची मला कल्पना नाही. मात्र, मला वाटतं की ही मराठीसाठीची आपली ही एकजूट कायम राहायला हवी. महाराष्ट्रात बाळासाहेब ठाकरे यांचं स्वप्न पुन्हा एकदा साकारावं अशी आशा, अपेक्षा व इच्छा मी व्यक्त करतो." असे म्हणून त्यांनी भाषणाचा समारोप केला.