मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा मुंबईत उपोषण सुरू केले आहे. शुक्रवारी (२९ ऑगस्ट) त्यांनी आझाद मैदानावर आंदोलनाला सुरुवात केली असून, त्यानंतर हजारोंच्या संख्येने मराठा समाजाचे लोक मुंबईत दाखल झाले आहेत. या आंदोलनामुळे वाहतूक व्यवस्थाही विस्कळीत झाली आहे. ठाणे येथील मनसे पदाधिकारी मेळाव्यानंतर राज ठाकरे यांना आंदोलनाबाबत माध्यमांनी प्रतिक्रिया विचारली असता त्यांनी थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाच सर्व विचारा असे सांगितले.
नेमकं काय म्हणाले राज ठाकरे?
आरक्षणाच्या प्रश्नावर अधिक विचारलं असता राज ठाकरे म्हणाले, "आरक्षणाबाबत माझी भूमिका सर्वांना माहिती आहे, ते आता पुन्हा सांगण्यासारखं काही नाही. मात्र, सध्याच्या परिस्थितीवर केवळ एकनाथ शिंदेच बोलू शकतात. यावेळी त्यांनी शिंदेंच्या आधीच्या भूमिकेची आठवण करून दिली. "मुंबईतील वाहतूक कोंडी, तुम्ही म्हणताय तसा लोकांना त्रास होतोय वगैरे गोष्टींवर शिंदेच बोलू शकतात. कारण मागच्या वेळेस एकनाथ शिंदे नवी मुंबईला जाऊन आरक्षणाचा प्रश्न सोडवून आले होते ना? मग जरांगे परत का आले? या सर्व गोष्टींची उत्तरं केवळ एकनाथ शिंदे देऊ शकतात." अशी प्रतिक्रिया राज ठाकरे यांनी दिली.