
वरळी येथे मराठी अस्मितेच्या मुद्द्यावर आयोजित करण्यात आलेल्या मेळाव्यात तब्बल दोन दशकांनंतर महाराष्ट्रातील दोन महत्त्वाचे राजकीय बंधू राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकाच व्यासपीठावर एकत्र आल्याचे ऐतिहासिक दृश्य पाहायला मिळाले. हे एकत्र येणं फक्त भावनिक नव्हतं, तर राजकीयदृष्ट्याही महत्त्वाचं ठरलं. कार्यक्रमाची सुरुवात होताच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाषणाच्या पहिल्याच मिनिटांत प्रखर भूमिका घेतली.
राज ठाकरे म्हणाले, ''खरं तर आज मोर्चा निघायला हवा होता. मराठी माणूस कसा एकवटतो याचं चित्र बघायला मिळालं असतं. पण, नुसत्या मोर्चाच्या चर्चेनेच माघार घ्यावी लागली. कारण आजचाही मेळावा शिवतीर्थावर व्हायला हवा होता. मैदान ओसंडून वाहिलं असतं.''
५ जुलै रोजी हिंदी भाषेच्या सक्तीविरोधात राज आणि उद्धव ठाकरे आंदोलनाच्या निमित्ताने व्यासपीठावर एकत्र येणार असल्याची घोषणा झाली होती. पण, त्याआधीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने हिंदी सक्तीबाबतचा जीआर रद्द केला. या पार्श्वभूमीवर राज ठाकरे म्हणाले, ''जे माननीय बाळासाहेबांना जमलं नाही, जे अनेकांना जमलं नाही, आम्हा दोघांना एकत्र आणायचं ते ते देवेंद्र फडणवीसांना जमलं". या वक्तव्यावर सभागृहात जोरदार टाळ्यांचा कडकडाट झाला.
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दोघे एकत्र येतील का? हा प्रश्न गेले अनेक वर्ष विचारला जात होता. पण, शेवटी मराठी अस्मितेच्या मुद्द्यावर हे दोघे एकत्र आले. यावेळी राज ठाकरे यांनी भाषणाच्या सुरुवातीलाच 'सन्माननीय उद्धव ठाकरे' हा शब्द उच्चारताच सभागृहात जोरदार प्रतिसाद उमटला.