महाराष्ट्र प्रशासनात मोठा बदल; राजेश अग्रवाल यांची मुख्य सचिवपदी नियुक्ती

कुमार यांचा कार्यकाळ याआधी तीन महिन्यांनी वाढवण्यात आला होता. पुढील दोन दिवसांत अग्रवाल पदभार स्वीकारणार असल्याचे सामान्य प्रशासन विभागाने स्पष्ट केले आहे.
महाराष्ट्र प्रशासनात मोठा बदल; राजेश अग्रवाल यांची मुख्य सचिवपदी नियुक्ती
Published on

राज्यात एकीकडे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची धामधूम सुरू आहे. तर, दुसरीकडे प्रशासनातील एका मोठ्या निर्णयाची राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. महाराष्ट्राच्या प्रशासनात एक महत्त्वाचा बदल म्हणजे राज्याला नवे मुख्य सचिव मिळाले आहेत. केंद्रात प्रतिनियुक्तीवर कार्यरत असलेले वरिष्ठ आयएएस अधिकारी राजेश अग्रवाल यांची आज (दि. २८) महाराष्ट्राचे नवे मुख्य सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

दोन दिवसांत स्वीकारणार पदभार

सध्या निवृत्तीच्या उंबरठ्यावर असलेले मुख्य सचिव राजेश कुमार (IAS १९८८) यांचा कार्यकाळ नोव्हेंबर अखेरीस संपत असून, अग्रवाल त्यांचे उत्तराधिकारी ठरणार आहेत. कुमार यांचा कार्यकाळ याआधी तीन महिन्यांनी वाढवण्यात आला होता. पुढील दोन दिवसांत अग्रवाल पदभार स्वीकारणार असल्याचे सामान्य प्रशासन विभागाने स्पष्ट केले आहे.

राज्य प्रशासनातही महत्त्वाची कामगिरी

राजेश अग्रवाल (IAS १९८९) हे जवळपास एक दशकापासून केंद्र सरकारच्या विविध मंत्रालयांमध्ये काम करत आहेत. त्यांनी वित्तीय सेवा, आदिवासी विकास, कौशल्य विकास, पेट्रोलियम आणि सामाजिक न्याय मंत्रालयातील जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत. अलीकडे ते सामाजिक न्याय मंत्रालयाच्या अपंग व्यक्ती विभागाचे सचिव होते. राज्य प्रशासनातही अग्रवाल यांनी महत्त्वाची कामगिरी केली असून, अकोल्याचे जिल्हाधिकारी, तसेच माहिती तंत्रज्ञान, लेखा व कोषागार विभागांमध्ये त्यांनी उल्लेखनीय भूमिका निभावली आहे. त्यांचा निवृत्तीचा कालावधी नोव्हेंबर २०२६ आहे.

तंत्रज्ञानाची प्रभावी पकड

राजेश अग्रवाल यांनी आयआयटी दिल्ली येथून संगणकशास्त्रात बी.टेक केले आहे. प्रशासकीय सेवेत रुजू झाल्यानंतरही त्यांनी शासन व्यवस्थेत तंत्रज्ञानाचा अधिक प्रभावी वापर कसा करता येईल, यावर सातत्याने लक्ष केंद्रित केले. तंत्रज्ञानावर आधारित उपाययोजना आणि आधुनिक प्रशासन या दोन्हींचा समन्वय साधण्याचा त्यांचा प्रयत्न नेहमीच ठळकपणे दिसून आला आहे. अग्रवाल यांची नियुक्ती झाल्यानंतर १९८९, १९९० आणि १९९१ बॅचमधील काही वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्यांना मुख्य सचिवपदाची संधी गमवावी लागू शकते, अशी चर्चा सूत्रांमध्ये आहे.

logo
marathi.freepressjournal.in