शिल्पकार राम सुतार यांना १०० व्या वर्षी 'महाराष्ट्र भूषण पुरस्कार २०२४' प्रदान

प्रख्यात शिल्पकार राम सुतार यांना वयाच्या १०० व्या वर्षी राज्याचा सर्वोच्च नागरी पुरस्कार 'महाराष्ट्र भूषण-२०२४' देऊन गौरवण्यात आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुतार यांची प्रकृती अस्वस्थ असल्यामुळे हा पुरस्कार नोएडा येथील त्यांच्या घरी जाऊन प्रदान केला.
शिल्पकार राम सुतार यांना १०० व्या वर्षी 'महाराष्ट्र भूषण पुरस्कार २०२४' प्रदान
Published on

प्रख्यात शिल्पकार राम सुतार यांना वयाच्या १०० व्या वर्षी राज्याचा सर्वोच्च नागरी पुरस्कार 'महाराष्ट्र भूषण-२०२४' देऊन गौरवण्यात आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुतार यांची प्रकृती अस्वस्थ असल्यामुळे हा पुरस्कार नोएडा येथील त्यांच्या घरी जाऊन प्रदान केला. यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, सुतार यांना मुंबईत भव्य सोहळ्यात पुरस्कार देण्याचे ठरले होते, परंतु त्यांच्या प्रकृतीमुळे हा गौरव नोएडामध्ये त्यांच्या घरी देण्याचे ठरले.

राम सुतार यांच्या वतीने त्यांचे पुत्र अनिल सुतार यांनी राज्य सरकार तसेच मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचे आभार मानले. मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले की, सुतार यांनी पुरस्कार स्वीकारल्यामुळे महाराष्ट्र भूषण पुरस्काराची उंची अधिक वाढली आहे.

७७ वर्षांमध्ये हजारो शिल्पे

राम सुतार हे शंभर वर्षांचे असून त्यांनी गेल्या ७७ वर्षांमध्ये हजारो शिल्पे साकारली आहेत. त्यांना यापूर्वीही पद्मश्री आणि पद्मभूषण पुरस्कार मिळाले आहेत. गुजरातमधील सरदार वल्लभभाई पटेलांचा जगातील सर्वात उंच 'स्टॅच्यू ऑफ युनिटी' हा पुतळा सुतार यांनी उभारला आहे. त्यांनी निर्माण केलेली शिल्पे १५ देशांमध्ये उभी आहेत. मुंबईतील इंदू मिलमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा भव्य पुतळा बनवण्याचे काम सुतार यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

जीवन परिचय

सुतार यांचा जन्म १९ फेब्रुवारी १९२५ रोजी धुळे जिल्ह्यातील गोंडूर या गावी झाला. सुरुवातीला त्यांनी श्रीराम कृष्ण जोशी यांचे मार्गदर्शन घेतले आणि त्यानंतर मुंबईतील जे. जे. स्कूल ऑफ आर्ट्स मध्ये शिक्षण पूर्ण केले. १९५९ मध्ये त्यांनी दिल्लीतील माहिती व दूरसंचार मंत्रालयात नोकरी सुरू केली, काही काळ नोकरी केल्यानंतर त्यांनी राजीनामा देऊन शिल्पकार म्हणून काम सुरू केले. नंतर दिल्लीत त्यांचा स्वतःचा शिल्पकलेचा स्टुडिओ सुरू झाला आणि तेव्हापासून त्यांनी अनेक ऐतिहासक पुतळे साकारले आहेत.

राम सुतार यांचे उल्लेखनीय कार्य

राम सुतार यांनी १९५४ ते १९५८ दरम्यान अजिंठा व एलोरा लेण्यांमध्ये पुरातन कोरीव कामांचा जीर्णोद्धार केला. मध्य प्रदेशातील ४५ फूट उंच चंबळ स्मारक हे त्यांच्या कारकिर्दीतील पहिले मोठे आणि कौतुक झालेले काम आहे. या स्मारकाचे अनावरण १९६१ मध्ये करण्यात आले. त्यांच्या इतर उल्लेखनीय शिल्पांमध्ये दिल्लीतील गोविंद बल्लभ पंत यांचा १० फूट लांबीचा कांस्य पुतळा, बिहारमधील कर्पूरी ठाकूर व अनुग्रह नारायण सिन्हा यांचे पुतळे, अमृतसरमधील महाराजा रणजित सिंग यांचा २१ फूट उंच पुतळा आणि स्टॅच्यू ऑफ युनिटी यांचा समावेश आहे.

पुरस्काराने सन्मानित

सुतार यांना त्यांच्या उल्लेखनीय कार्याबद्दल भारत सरकारकडून १९९९ मध्ये पद्मश्री, २०१६ मध्ये पद्मभूषण आणि ऑक्टोबर २०१८ मध्ये सांस्कृतिक समरसतेसाठी टागोर पुरस्कार मिळाले. राम वनजी सुतार हे भारतातील सर्वात अनुभवी शिल्पकार मानले जातात आणि त्यांच्या नावावर जगातील सर्वात उंच पुतळा उभारण्याचा विक्रम आहे.

logo
marathi.freepressjournal.in