Ram Sutar Passes Away : भारतीय शिल्पकलेतील युगाचा अंत; ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’चे शिल्पकार राम सुतार यांचे निधन

जगातील सर्वात उंच ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’चे शिल्पकार आणि भारतातील ज्येष्ठ शिल्पकार राम सुतार यांचे वयाच्या १००व्या वर्षी नोएडामध्ये निधन झाले.
Ram Sutar Passes Away : भारतीय शिल्पकलेतील युगाचा अंत; ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’चे शिल्पकार राम सुतार यांचे निधन
Ram Sutar Passes Away : भारतीय शिल्पकलेतील युगाचा अंत; ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’चे शिल्पकार राम सुतार यांचे निधन
Published on

जगातील सर्वात उंच पुतळा असलेल्या गुजरातमधील ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ चे भारतातील ज्येष्ठ शिल्पकार राम वनजी सुतार यांचे बुधवारी (दि.१७) रात्री उशिरा नोएडामधील त्यांच्या निवासस्थानी निधन झाले. ते १०० वर्षांचे होते. वृद्धापकाळाशी संबंधित आजारांमुळे ते काही काळापासून आजारी होते. त्यांच्या निधनाने भारतीय भव्य शिल्पकलेतील एका ऐतिहासिक पर्वाचा अंत झाला आहे.

या बातमीला दुजोरा देताना त्यांचा मुलगा अनिल सुतार यांनी गुरुवारी (दि.१८) निवेदनात सांगितले, “अत्यंत दुःखाने कळवतो की माझे वडील, ज्येष्ठ शिल्पकार राम वनजी सुतार यांचे १७ डिसेंबर रोजी मध्यरात्री आमच्या नोएडामधील निवासस्थानी निधन झाले.”

धुळे जिल्ह्यातील गावातून जागतिक ओळख

१९ फेब्रुवारी १९२५ रोजी महाराष्ट्रातील धुळे जिल्ह्यातील गोंदूर गावात जन्मलेल्या राम सुतार यांनी लहानपणापासूनच कला आणि शिल्पकलेची आवड जोपासली. पुढे त्यांनी मुंबईतील प्रतिष्ठित सर जे. जे. स्कूल ऑफ आर्ट अँड आर्किटेक्चर येथून शिक्षण घेतले. त्यांनी सुवर्णपदक मिळवत पदवी संपादन केली. त्यानंतर सुरू झालेला त्यांचा कलाप्रवास तब्बल सात दशकांहून अधिक काळ चालू राहिला.

राष्ट्रीय स्मारकांची दृश्य भाषा घडवणारे शिल्पकार

राम सुतार यांच्या कलाकृतींमध्ये महात्मा गांधींचा ध्यानस्थ पुतळा, संसद भवन परिसरातील छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा, तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले यांच्यासह अनेक राष्ट्रीय नेत्यांचे आणि समाजसुधारकांचे पुतळे समाविष्ट आहेत.

त्यांची सर्वात प्रसिद्ध आणि जागतिक स्तरावर ओळखली जाणारी कलाकृती म्हणजे ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’. भारताचे पहिले उपपंतप्रधान आणि गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांना समर्पित असणारे हे शिल्प १८२ मीटर उंच आहे. ही कलाकृती सध्या जगातील सर्वात उंच पुतळा म्हणून ओळखली जाते.

सन्मान आणि गौरव

भारतीय कला आणि सांस्कृतिक वारशातील अमूल्य योगदानाबद्दल राम सुतार यांना अनेक मानाचे पुरस्कार मिळाले. १९९९ मध्ये पद्मश्री, २०१६ साली पद्मभूषण तर २०२५ मध्ये महाराष्ट्र शासनाचा सर्वोच्च नागरी सन्मान महाराष्ट्र भूषण पुरस्काराने त्यांना गौरवण्यात आले.

शेवटपर्यंत सक्रिय

वयाच्या १००व्या वर्षीही राम सुतार कार्यरत होते. मुंबईतील इंदू मिल येथे उभारल्या जाणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाच्या कामात ते सक्रियपणे सहभागी होते. आयुष्याच्या अखेरच्या क्षणांपर्यंत शिल्पकलेशी असलेली त्यांची निष्ठा आणि समर्पण सर्वांसाठी प्रेरणादायी ठरली.

मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांकडून श्रद्धांजली

राम सुतार यांच्या निधनानंतर विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुतार यांना “दगडाला प्राण देणारा जागतिक कलाकार” असे संबोधले. अलीकडेच नोएडामधील त्यांच्या निवासस्थानी जाऊन महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान केल्याची आठवण त्यांनी व्यक्त केली. "पुरस्कार स्वीकारताना त्यांनी 'महाराष्ट्र माझा' या गीताच्या ओळी उच्चारल्या तेव्हा भारावून गेलो होतो."असेही मुख्यमंत्र्यांनी नमूद केले.

"साधेपणा आणि नम्रपणा हा त्यांचा स्थायीभाव होता. देशभरातील अनेक मूर्तिकारांना घडवण्यात त्यांचं मोलाचं योगदान होतं. दगडातून जिवंत भावना साकारणारा जादूगार आज शांत झाला असला, तरी त्यांनी घडवलेली शिल्पे युगानुयुगे त्यांची आठवण करून देत राहतील. राम सुतार यांच्या निधनानं भारतीय स्मारक शिल्पांना जागतिक पातळीवर ओळख मिळवून देणारा उत्तुंग प्रतिभेचा शिल्पकार आपण गमावला आहे. त्यांच्या कुटूंबियांना हे दुःख सहन करण्याची शक्ती मिळो, अशी प्रार्थना करतो." अशा भावना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केल्या.

"नर्मदा तीरावरील सरदार वल्लभभाई पटेल यांचा 'स्टॅच्यू ऑफ युनिटी', संसदेतील महात्मा गांधींचा पुतळा अशा अनेक अजरामर कलाकृतींच्या माध्यमातून ते सदैव आपल्यासोबत असतील. त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन. भावपूर्ण श्रद्धांजली." असे म्हणत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आदरांजली अर्पण केली.

शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

"ज्येष्ठ शिल्पकार महाराष्ट्रभूषण राम सुतार यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात यावेत, यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना संपर्क करून विनंती केली होती. ती उत्तर प्रदेश सरकारने तत्काळ मान्य केली आहे. त्यानुसार, राम सुतार यांच्या पार्थिवावर नोएडा येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येतील." अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

धुळे जिल्ह्यातील एका ग्रामीण गावातून सुरू झालेला राम सुतार यांचा प्रवास जागतिक कीर्तीपर्यंत पोहोचला. ते जरी आज आपल्यातून निघून गेले असले, तरी त्यांनी घडवलेली भव्य स्मारके पिढ्यान्‌पिढ्या त्यांच्या कलेची साक्ष देत उभी राहणार आहेत.

logo
marathi.freepressjournal.in