

मालवणमध्ये शिवसेना (शिंदे गट) आमदार निलेश राणे यांनी भाजप पदाधिकारी विजय किनवडेकर यांच्या घरावर टाकलेल्या धाडीनंतर कोकणात राजकीय खळबळ उडाली आहे. बुधवारी (दि. २६) झालेल्या या कारवाईमुळे महायुतीमध्ये तणाव वाढला असून, निवडणूक जवळ येत असतानाच आरोप-प्रत्यारोपांची मालिका अधिकच तीव्र झाली आहे. विशेष म्हणजे, या प्रकरणात आता निलेश राणेंच्या विरोधात त्यांचे भाऊ आणि भाजप नेते नितेश राणे यांनीच उघडपणे नाराजी व्यक्त केली आहे.
धाडीत मोठा खुलासा
मंगळवारी निलेश राणे स्वतः ‘स्टिंग ऑपरेशन’च्या माध्यमातून किनवडेकर यांच्या घरी गेले. त्यांच्या म्हणण्यानुसार, घरातील एका खोलीत हिरव्या रंगाच्या बॅगेत सुमारे २५ लाखांची बेहिशोबी रोकड आढळली. “पैसे वाटपाची प्रक्रिया सुरू होती. अजून काही बॅगा घरात आहेत,” असा थेट आरोप निलेश राणेंनी केला.
यासोबतच त्यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे नाव घेत कठोर टीका केली. “चव्हाण सिंधुदुर्गात दाखल झाल्यापासून पैशांची हालचाल सुरू झाली,” असा आरोप त्यांनी केला. तसेच काही भाजप पदाधिकाऱ्यांची नावे घेत, “हे लोक अंगावर बॅगा घेऊन फिरतात,” असे गंभीर वक्तव्यही त्यांनी केले.
नितेश राणेंचा पलटवार
या धाडीनंतर भाजपने बचावात्मक भूमिका घेतली असून, नितेश राणे यांनी थेट आपल्या भावालाच प्रश्न विचारत त्यांचे दावे फेटाळले. तसेच, निलेश राणेंच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
नितेश राणे म्हणाले, "आम्ही भाजप, शिवसेना, NCP चे कार्यकर्ते होण्याअगोदर आमचे स्वत:चे व्यवसाय पण असतात. आम्ही नोकऱ्या पण करतो. राजकीय आणि सामाजिक कार्य करण्यासाठी पक्षाचे कार्यकर्ते बनतो. पण, आमच्या स्वत: च्या व्यवसायामध्ये कुठल्यातरी गुंतवणुकीसाठी, व्यवसायासाठी अगर आमच्या घरामध्ये, ऑफिसमध्ये पैसे असतील तर त्यात चूक काय आहे? मला मुळात ही गोष्ट कळली नाहीये. उगाच भारतीय जनता पक्ष असं बोलून पक्षाची बदनामी कोणी करू नये."
ते पुढे म्हणाले की, "राजकारणासाठी आम्ही पोटापाण्याचा प्रश्न बाजूला तर ठेवू शकत नाही ना? तेच विजय किनवडेकर करतात. बाजारपेठेत त्यांचं स्वत:च दुकान आहे. त्यांचा व्यवसाय आहे आणि व्यवसायाच्या दृष्टिकोनातून त्यांच्या घरामध्ये अशी उलाढाल असेल, तर मला कळत नाही काय चुकीच आहे?"
भाजपला पैसे वाटण्याची गरज नाही
तसेच, भाजपला पैसे वाटून निवडणूक लढवण्याची गरज नसल्याचे स्पष्ट करत राणे म्हणाले, "मला कोणाच्या आरोप प्रत्यारोपात जायचंच नाहीये. कारण आता सगळी तक्रार राज्य निवडणूक आयोगाकडे गेली आहे. पोलिस चौकशी करत आहेत. त्यामध्ये आम्ही कोणी हस्तक्षेप करणे चुकीच आहे. पण, मला एवढं माहीत आहे, की विजय किनवडेकर यांच्याकडून कोणतीही चूक होणार नाही आणि दुसरी गोष्ट भाजपला अशा प्रकारच्या निवडणुका लढवण्याची काहीही गरज नाही. आमच्याकडे नरेंद्र मोदींसारखं नेतृत्व आहे. आमच्याकडे फडणवीस साहेबांसारखे मुख्यमंत्री आहेत. म्हणून आम्हाला अशा प्रकारच्या गोष्टी करायची गरज नाही. आम्ही विकासावर, आमच्या योजनांवर निवडणुका लढवू शकतो. याबाबतीत पोलिस खात्यातून, निवडणूक आयोग स्पष्ट करेल."
हमाम में तो सब…
नितेश राणेंनी पक्षाच्या ताकदीवर विश्वास व्यक्त करत सांगितले, "ही चौकशी पारदर्शक होणार. आमची हीच अपेक्षा आहे. आता सगळ्यांच्या या ३-४ दिवसांत तक्रारी येतील, त्या तशाच पद्धतीने निपक्ष पद्धतीने चौकशी व्हावी. कारण जे म्हणतात ना हमाम में सब नंगे होते है... म्हणून विचारपूर्वक या गोष्टी झाल्या पाहिजेत. कारण मला विश्वास आहे, ज्या पद्धतीने भारतीय जनता पक्ष, आमचे प्रदेशाध्यक्ष आणि एकंदरीत आमचा पक्ष म्हणून काम करत आहोत त्यासाठी पैसे वाटण्याची काही गरज नाही.. घराघरामध्ये आमचे लाभार्थी तयार आहेत. वेगळं काय त्यांना द्यायची गरजच नाहीये, कारण सरकारने योजनेच्या माध्यमातून खूप काही दिलं आहे."
त्यांच्या या विधानाने कोकणातील राणे बंधूंचा वाद उघडपणे समोर आला आहे. सध्या मालवण आणि संपूर्ण सिंधुदुर्गातील राजकीय वातावरण या प्रकरणामुळे अधिकच तापले आहे.