सीएनजी टँकर आणि खासगी मिनी ट्रॅव्हल्स बसचा बावनदीजवळ भीषण अपघात; ३० शिक्षक जखमी, सीएनजी गळतीने घराला आग

मुंबई-गोवा महामार्गावरील बावनदी परिसरात रविवारी सकाळी सव्वाआठच्या सुमारास सीएनजी टँकर आणि खासगी मिनी ट्रॅव्हल्स बसचा भीषण अपघात झाला. या मिनी ट्रॅव्हल्समध्ये ३० शिक्षक प्रवास करत होते. ते सर्व शिक्षक जखमी झाले असून, टँकरमधून गळालेल्या गॅसला लागलेल्या आगीमुळे परिसरात मोठा गोंधळ निर्माण झाला.
ratnagiri-cng-tanker-bus-accident-june-2025
Published on

मुंबई-गोवा महामार्गावरील बावनदी परिसरात रविवारी सकाळी सव्वाआठच्या सुमारास सीएनजी टँकर आणि खासगी मिनी ट्रॅव्हल्स बसचा भीषण अपघात झाला. या मिनी ट्रॅव्हल्समध्ये ३० शिक्षक प्रवास करत होते. हे सर्व शिक्षक जखमी झाले असून, टँकरमधून गळालेल्या गॅसला लागलेल्या आगीमुळे परिसरात मोठा गोंधळ निर्माण झाला. या आगीमुळे एका घराला आग लागली असून त्यात एक म्हैस देखील जखमी झाली आहे. अपघातानंतर महामार्गावरील वाहतूक पूर्णतः ठप्प झाली असून प्रशासनाकडून युद्धपातळीवर मदतकार्य सुरू आहे.

अपघाताची घटना कशी घडली?

मिनी बसमधून प्रवास करणारे सर्व शिक्षक चिपळूण येथून रत्नागिरी येथे आयोजित प्रशिक्षणासाठी येत होते. तर, सीएनजीने भरलेल्या टँकरने मुंबईच्या दिशेने जात असताना, ट्रॅव्हल्स बसला बावनदीजवळ जोरदार धडक दिली. टँकरच्या धडकेनंतर मिनी बस चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि गाडी रस्त्याच्या कडेला सुमारे वीस फूट खाली कोसळली. या अपघातात ट्रॅव्हल्समधील सर्व प्रवासी जखमी झाले असून, त्यांना तातडीने रत्नागिरी जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले.

सीएनजी गळती आणि लागलेली आग

अपघातानंतर टँकरमधील सीएनजी टाकी गटाराशेजारी पडली आणि मोठ्या प्रमाणात गॅस गळती सुरू झाली. हवेत पसरलेल्या सीएनजीने अचानक पेट घेतल्याने जवळच असलेल्या एका घराला आग लागली. या आगीत घरासमोरील रिक्षा आणि दोन दुचाकी जळून खाक झाल्या. घरातील म्हैस भाजली असली तरी, सुदैवाने रहिवाशांनी वेळेवर बाहेर धाव घेतल्यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही.

अपघातात जखमी झालेल्या शिक्षकांची नावे

या अपघातात जखमी झालेल्या शिक्षकांमध्ये संतोष जागुष्टे, विराज सावंत, मंदार खाडे, स्मिता पाटील, उषा खुडे, जयश्री गावडे, प्रियंका जाधव, स्नेहा मिस्त्री, धर्मेंद्र देरुगडे, दिलीप डोंगरे, सुलक्षणा पाटील, निशिकांत वानरकर, रुपाली यादव, हर्षाली पाकळे, निता बांदरे, मिना घाडगे, कमल महाडिक, प्रेमकुमार शिवगण, अमोल कोनवाल, मनिषा कांबळे, मालिनी चव्हाण, श्वेता चव्हाण, राजेश यादव, गणेश सावर्डेकर, सुरेंद्र सावंत, सचिन पोकळे, उदय खताते, अरविंद सकपाळ, मिना शिरकर आणि रोहित चव्हाण यांचा समावेश आहे.

प्रशासनाची तातडीची मदत

अपघाताची माहिती मिळताच पोलीस, अग्निशमन दल, वाहतूक विभाग आणि बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले. जखमी प्रवाशांना बाहेर काढून उपचारासाठी तात्काळ रुग्णालयात हलवण्यात आले. सकाळी पावणे नऊच्या सुमारास टँकरमधील उरलेला सीएनजी सुरक्षितरीत्या बाहेर काढण्याचे काम सुरू करण्यात आले.

वाहतूक व्यवस्थेवर परिणाम

या अपघातामुळे मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक चार ते पाच तास ठप्प झाली आहे. दोन्ही बाजूंनी अवजड वाहनांच्या रांगा लागल्या असून, प्रशासनाने वाहतूक संगमेश्वर व पाली मार्गे वळवली आहे.

पोलिसांची कारवाई आणि परिस्थिती नियंत्रण

रत्नागिरीचे पोलीस अधीक्षक नितीन बगाटे घटनास्थळी आपल्या पथकासह उपस्थित असून, परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न करत आहेत. अग्निशमन दल, वाहतूक पोलीस आणि स्थानिक प्रशासन एकत्रितपणे काम करत आहेत.

logo
marathi.freepressjournal.in