Ratnagiri : दीड दिवसांच्या गणपती विसर्जनावेळी काळाचा घाला; जगबुडी नदीत दोघे बुडाले, एकाचा मृत्यू

गणेशोत्सवात रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यात दुर्दैवी घटना घडली आहे. अलसुरे येथील भोस्ते गावात दीड दिवसांच्या गणेशमूर्ती विसर्जनावेळी दोघेजण जगबुडी नदीत बुडाले.
Photo - IANS
Photo - IANS
Published on

गणेशोत्सवात रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यात दुर्दैवी घटना घडली आहे. अलसुरे येथील भोस्ते गावात दीड दिवसांच्या गणेशमूर्ती विसर्जनावेळी दोघेजण जगबुडी नदीत बुडाले. त्यापैकी एकाचा मृत्यू झाला असून दुसरा तरुण कसाबसा बचावला. गुरुवारी संध्याकाळी ६ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.

मृत व्यक्तीचे नाव मंगेश पाटील (वय ४०, रा. भोस्ते पाटीलवाडी) असे असून, त्यांच्या पश्चात पत्नी आणि दोन मुले असा परिवार आहे. विशेष म्हणजे यंदाच पहिल्यांदा त्यांच्या घरी गणपती बाप्पाची स्थापना झाली होती. विसर्जनासाठी नदीत उतरल्यावर पाण्याचा प्रवाह वाढल्याने ते दोघेही बुडाले. त्यांच्यासोबत असलेला दुसरा तरुण मात्र कसाबसा जीव वाचवत पोहत किनाऱ्यावर पोहोचला.

घटनेची माहिती मिळताच खेड नगरपरिषदेचे अग्निशामक दल, विसर्जन कट्टा पथक, खेड रेस्क्यू टीम तसेच एनडीआरएफचे जवान घटनास्थळी दाखल झाले. सर्वांनी तातडीने शोधमोहीम सुरू केली. रात्री उशिरापर्यंत शोधकार्य सुरू असले तरी परिस्थिती बिकट होती.

या दुर्घटनेमुळे भोस्ते गावात शोककळा पसरली आहे. घटनास्थळी माजी आमदार संजय कदम यांनी भेट देऊन पाहणी केली. तसेच तहसीलदार, प्रांताधिकारी, उपविभागीय पोलिस अधिकारी आणि पोलिस निरीक्षकांनीही पथकासह हजेरी लावून मदतकार्याचे समन्वयन केले.

logo
marathi.freepressjournal.in