

पुणे : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी प्रवक्ते, प्रसिद्ध राजकीय विश्लेषक आणि विचारवंत डॉ. रत्नाकर महाजन यांचे शनिवारी सकाळी पुण्यातील राहत्या घरी निधन झाले. ते ८० वर्षांचे होते. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते.
अखेर शनिवारी सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली. येथील वैकुंठ स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. आपली अभ्यासपूर्ण मांडणी, परखड भूमिका आणि पुरोगामी विचारांसाठी परिचित असलेल्या डॉ. महाजन यांनी आयुष्यभर राज्यघटना, धर्मनिरपेक्षता आणि सामाजिक न्यायासाठी सातत्याने लढा दिला.
डॉ. महाजन हे मूळचे इंदापूर तालुक्यातील रहिवासी होते. उच्च शिक्षणाच्या निमित्ताने ते पुण्यात आले आणि पुढे पुणे हीच त्यांची मुख्य कर्मभूमी बनली.
समाजवाद आणि गांधीवादी विचारसरणीचा त्यांच्या व्यक्तिमत्त्वावर अत्यंत प्रभाव होता. डॉ. महाजन यांनी १९८६-८७ च्या दरम्यान इंदापूर तालुक्यात शेतकरी, वीज, पाणी आणि रस्त्यांच्या बिकट प्रश्नांवर पायी पदयात्रा काढून मोठी जनजागृती घडवून आणली.