पुणे (प्रतिनिधी) “सुरुवातीपासूनच ही राजकीय लढाई असल्याची आम्ही भूमिका घेतली आहे. त्यामुळे या निवडणुकीत नात्याचं राजकारण आणणं एक प्रकारे चुकीचं आहे. लोकसभा निवडणूक ही फार मोठी आहे. त्यामुळे राजकारण राजकारणाच्या जवळ, तर नातं हे नात्याच्या जवळ ठेवलं तर चांगलं होईल,” अशी भूमिका उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी आणि बारामती लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांनी स्पष्ट केली.
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट पडल्यानंतर बारामती लोकसभा मतदारसंघात पहिल्यांदाच पवार विरुद्ध पवार असा सामना होत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्याविरोधात खासदार सुप्रिया सुळे या निवडणुकीच्या मैदानात आहेत. या निवडणुकीवरून अजितदादांना त्यांचं नेतृत्व सिद्ध करण्याची तर सुप्रिया सुळे यांना स्वत: अस्तित्व टिकवून ठेवण्याची वेळ आल्याचे दिसून येत आहे. दोन्ही बाजूंनी आपल्या प्रचाराला जोरदार सुरुवात केली आहे. यावरूनच सुनेत्रा पवार यांनी निवडणुकीबाबत मोठं भाष्य केलं आहे.
एका बाजूला ज्येष्ठ नेते शरद पवार, तर दुसऱ्या बाजूला अजितदादांसारखे नेतृत्व आहे. त्यामुळे या निवडणुकीत तुम्हाला दडपण वाटतं का? असा प्रश्न केला असता सुमित्रा पवार म्हणाल्या, “सुरुवातीपासूनच ही राजकीय लढाई असल्याची आम्ही भूमिका घेतली आहे. त्यामुळे या निवडणुकीत नात्याचं राजकारण आणणं एकप्रकारे चुकीचं आहे. लोकसभा निवडणूक ही फार मोठी आहे. त्यामुळे राजकारण राजकारणाच्या जागी, तर नातं हे नात्याच्या जागी ठेवलं तर चांगलं होईल.” अजित पवार यांनी भाजपसोबत जाण्याच्या भूमिकेबाबत विचारले असता त्यांनी अजित पवार यांच्या भूमिकेला साथ देण्याचे मत मांडले.