
भिवंडी : मतभेदांचा आदर करणे आवश्यक आहे आणि एकता हे समृद्धतेत जगण्यासाठी महत्त्वाचे आहे, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी केले.
भिवंडीतील पद्मश्री अण्णासाहेब जाधव विद्यालय येथे देशाचा ७६ वा प्रजासत्ताक दिन सोहळ्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
ते म्हणाले की, भारताच्या बाहेर विविधतेमुळे संघर्ष होत आहेत. आम्ही विविधतेला जीवनाचा एक नैसर्गिक भाग मानतो. तुमच्याकडे तुमची खास वैशिष्ट्ये असू शकतात, परंतु तुम्ही एकमेकांशी चांगले वागले पाहिजे. जर तुम्हाला जगायचे असेल, तर ते एकजूट असले पाहिजे. तुमच्या कुटुंबाला दुःख असेल तर तुम्ही आनंदी होऊ शकत नाही. तसेच एक शहर संकटात असेल तर एक कुटुंब सुखी होऊ शकत नाही," असे ते म्हणाले.
भारताची जगभरात त्याची प्रतिष्ठा वाढत असून अर्थकारणातली शक्ती वाढत आहे. मात्र आज जो आदर सत्कार आणि लौकिक आपल्याला मिळत आहे तो कुणामुळे आहे? जर उदाहरण द्यायचं असेल तर येथे २७ हजार विद्यार्थी उत्तम शिक्षण घेत आहे. ते कुणामुळे तर त्याचं उत्तर हे आहेत की पद्मश्री अण्णासाहेब जाधव यांनी मोठ्या त्यागातून हे विद्यालय उभे केले आहे. हे परिश्रम त्यांनी स्वतःसाठी नाही तर राष्ट्रासाठी केले आहे. आपल्या देशाला अजून पुढे जायचं आहे. त्यासाठी संपूर्ण विश्व याची वाट पाहत आहे की भारताकडून आपल्याला पुढचा मार्ग मिळेल, असे त्यांनी सांगितले.
आज आनंदात सोहळा साजरा करतोय कारण यापूर्वी अनेकांनी आपल्या आयुष्याचे समर्पण करत त्याग केला आहे. आपल्या देशाचे दायित्व इथल्या जन गन मन आणि लोकशाहीवर आहे. ही कोण्या एकाची जबाबदारी नसल्याचे त्यांनी सांगितले.
आपला ‘तिरंगा’ हा मोठ्या विचारपूर्वक बनवला आहे. यासाठी एक समिती गठीत केली. तीन रंगाचा ध्वज आणि त्यात धम्मचक्र असं या ध्वजात असून वरील बाजूस त्याग आणि कर्माचा रंग आहे. भक्ती, त्याग आणि कर्माच्या त्रिवेणीचं प्रतीक असलेल्या भगवा आहे. समर्पणाचा रंग पांढरा आहे. तर समृद्धीचा रंग हिरवा आहे, असेही सरसंघचालक म्हणले.