
जगद्गुरू संत तुकाराम महाराजांनी त्याकाळी सरसकट कर्जमाफी केली होती. या विचाराने प्रेरित होऊन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी देहू येथे उपोषण केले आहे. राज्यात अतिवृष्टी, पुर आणि नैसर्गिक आपत्तीमुळे उध्वस्त झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा मिळावा यासाठी त्यांनी एक दिवसांच लाक्षणिक उपोषण सुरू केल्याचं म्हटलं. या उपोषणाला सुरुवात करण्यापूर्वी त्यांनी जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या देहू येथील मंदिरात दर्शन घेतले. त्यानंतर मंदिराच्या प्रवेशद्वारासमोर हरिनामाच्या गजरात उपोषण सुरू केले. या उपोषणात त्यांच्यासोबत वारकरी आघाडीचे प्रमुख दत्ता महाराज दोन्हे पाटील आणि अन्य वारकरी सहभागी झाले आहेत.
अतिवृष्टीचा तडाखा, शेतकऱ्यांचे हाल
गेल्या सप्टेंबर महिन्यात राज्यभरात झालेल्या अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. पीक, जनावरे, घरे, शेतजमिनी वाहून गेल्या आणि अनेक शेतकरी संकटात सापडले. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने नुकतेच ३२ हजार कोटी रुपयांचे मदत पॅकेज जाहीर केले. मात्र, ही मदत पुरेशी नसल्याची भावना शेतकऱ्यांमध्ये आहे. याच कारणावरून आता राजकारणही तापले आहे. शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफीच त्यांच्या पुनर्वसनाचा एकमेव मार्ग असल्याचे रोहित पवार म्हणाले.
तुकाराम महाराजांच्या विचारांनी प्रेरित आंदोलन
उपोषणादरम्यान रोहित पवार म्हणाले, "जगद्गुरू संत तुकाराम महाराजांनी जगातली पहिली कर्जमाफी केली. ती कोणासाठी केली? लोकांसाठी केली. नुकसान आर्थिक कोणाचं झालं? तर सरकारचं नाही त्यांचं झालं. त्यांनी व्यक्तिगत स्वत:चं नुकसान करून घेतलं. त्यांनी माणसांकडे बघताना व्यवहार म्हणून बघितलं नाही तर माणूस म्हणून बघितलं. त्यामुळे त्यांनी जगातील पहिली कर्जमाफी करून दाखवली. त्यानंतर महाविकास आघाडीमध्ये कर्जमाफी केली ती सरसकट केली."
राज्य सरकारवर निशाणा साधत पवार म्हणाले, "आता आजची परिस्थिती जर बघितली तर इथे येणारा प्रत्येक शेतकरी, शेतमजूर मोठ्या आर्थिक संकटात आहे. जे काही विचार संतांनी दिले होते ते बाजूला सारून हे सरकार वेगळेच मनुवादी विचार आणण्याचा प्रयत्न करत आहे.
देवाकडे घातले साकडे
त्यांनी देवाकडे साकडे घातले आहे, की "पूर्वीचा जो काळ होता, लोकांना विश्वासात घेऊन, त्यांचा विचार करून पॉलिसी आखणे, निर्णय घेणे अशाप्रकारचे राज्य येवो."
सरकारला प्रस्ताव देणार
उपोषण संपल्यानंतर रोहित पवार सरकारकडे ‘जगद्गुरू संत तुकाराम महाराज कर्जमाफी योजनेचा प्रस्ताव’ अधिकृतपणे सादर करणार आहेत. त्यांनी सांगितले की, या मागणीसाठी ते आगामी अधिवेशनात देखील आवाज उठवतील. ही केवळ राजकीय भूमिका नाही, तर शेतकऱ्यांच्या जगण्याचा प्रश्न आहे, असेही पवार म्हणाले.