

समृद्धी महामार्गावर गेल्या काही वर्षांत घडलेल्या अपघातांमुळे प्रवासी सुरक्षेबाबत प्रश्न निर्माण झाले आहेत. २०२३ मध्ये खासगी ट्रॅव्हल्स बसला आग लागून २६ प्रवाशांचा मृत्यू झाल्याची दुर्घटना अजूनही लोकांच्या मनात ताजी असतानाच, बुलढाण्याजवळ पुन्हा एकदा असाच थरार अनुभवायला मिळाला. नागपूरहून मुंबईच्या दिशेने येणाऱ्या खुराणा ट्रॅव्हल्सच्या खासगी बसला अचानक लागलेल्या आगीमुळे काही मिनिटांतच मृत्यू समोर उभा ठाकला होता. मात्र, नशीब आणि चालकाच्या प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळला.
प्राथमिक माहितीनुसार, सोमवारची मध्यरात्र उलटून गेल्यावर मेहकर तालुक्यातील शिवणी पिसा गावाजवळ, सिंदखेड राजा परिसरात ही घटना घडली. लक्झरी बसच्या इंजिनमधून अचानक धूर यायला लागला. सुदैवाने चालकाच्या हे लक्षात आले आणि त्याने क्षणाचाही विलंब न करता बस रस्त्याच्या बाजूला उभी केली. आरडाओरड करून प्रवाशांना खाली उतरण्यास सांगितले. उतरताना गोंधळात काही प्रवासी खरचटल्यामुळे किरकोळ जखमी झाले. सर्व प्रवासी उतरून रस्त्याच्या बाजूला आले आणि पुढच्या काही क्षणांतच संपूर्ण बस जळून खाक झाली. चालकाने वेळीच सर्व प्रवाशांना सतर्क केल्याने आणि वेळेत बाहेर काढल्याने मोठी जीवितहानी टळली. ‘काळ आला होता, पण वेळ आली नव्हती’ अशी भावना व्यक्त करत प्रवाशांनी सुटकेचा निश्वास सोडला, मात्र हा थरार त्यांच्या आयुष्यभर लक्षात राहणारा ठरला.
अचानक का लागली आग?
घटनेची माहिती मिळताच महामार्ग पोलीस, स्थानिक पोलीस आणि अग्निशमन दल तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले आणि काही काळ विस्कळीत झालेली वाहतूक पुन्हा सुरळीत करण्यात आली. आग लागण्याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसले तरी शॉर्टसर्किट किंवा तांत्रिक बिघाडामुळे आग लागली असावी असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.
'त्या' काळरात्रीची पुन्हा आठवण
२०२३ मध्ये याच समृद्धी महामार्गावर ट्रॅव्हल्स बस पेटून २६ जणांचा मृत्यू झाला होता. त्या घटनेच्या कटू आठवणी या दुर्घटनेमुळे पुन्हा ताज्या झाल्या असून, समृद्धी महामार्गावरील प्रवासी सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.