सांगलीत हत्येचा थरार! आधी बर्थडे पार्टीत जेवले, मग केले सपासप वार; दलित महासंघाच्या जिल्हाध्यक्षाचा खून

सांगलीत हत्येचा थरार! आधी बर्थडे पार्टीत जेवले, मग केले सपासप वार; दलित महासंघाच्या जिल्हाध्यक्षाचा खून
Published on

सांगलीत 'मुळशी पॅटर्न'सारखीच एक धक्कादायक घटना मंगळवारी (दि. ११) रात्री गारपीर चौकात घडली. दलित महासंघाच्या जिल्हाध्यक्षांची त्यांच्या वाढदिवसादिवशीच चाकूने सपासप वार करून निर्घृण हत्या करण्यात आली. आरोपी आधी बर्थडे पार्टीमध्ये जेवले आणि त्यानंतर त्यांनी वार केला. यावेळी मुख्य आरोपी देखील जखमी झाला असून त्याचाही मृत्यू झाल्याचे समजते. या हत्याकांडामुळे सांगली शहरात मोठी खळबळ उडाली आहे.

दलित महासंघाचे (मोहिते गट) संस्थापक अध्यक्ष उत्तम जिन्नाप्पा मोहिते (वय ३८) यांचा या हल्ल्यात मृत्यू झाला. संशयित रेकॉर्डवरील गुन्हेगार शाहरुख शेख याने गणेश मोरे, सतीश लोखंडे, बन्या उर्फ यश लोंढे, अजय घाडगे, जितेंद्र लोंढे, योगेश शिंदे आणि समीर ढोले या साथीदारांसोबत मिळून ही हत्या केली. यामध्ये शाहरुख शेख जखमी झाला असून त्याचाही मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे.

किरकोळ वाद रक्तरंजित घटनेत बदलला

उत्तम मोहिते यांचा मंगळवारी (दि.११) वाढदिवस होता. त्यांच्या घराशेजारील मोकळ्या जागेत मंडप उभारून मित्रपरिवार आणि नातेवाईकांसाठी जेवणाचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता. रात्रीचा माहोल आनंदाचा होता, पण काही तासांतच तो भीषण हत्याकांडात बदलला. शाहरुख आपल्या मित्रांसोबत कार्यक्रमाला आला. सुरुवातीला त्याला प्रवेश नाकारल्याने किरकोळ वाद निर्माण झाला. पण, हा वाद मोहिते यांच्या मध्यस्थीने मिटला.

पुढे हे सर्वजण पार्टीत जेवले. त्यानंतर त्यांनी शुभेच्छा देण्यासाठी स्टेजवर प्रवेश केला आणि धारदार गुप्तीने मोहिते यांच्यावर हल्ला केला. आरोपींनी उत्तम मोहिते यांच्या पोटात, छातीवर, कानावर, डोक्यावर आणि हातावर वार केल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. या हल्ल्यात मोहिते यांचा पुतण्या योसेफ सतीश मोहिते (वय २१) मध्यस्थी करायला गेला असता, त्याच्यावरही जीवघेणा हल्ला करण्यात आला असून तोही जखमी झाला आहे.

उत्तम मोहिते हे सांगलीतील सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात कार्यरत होते. त्यांनी अनेकदा विविध समस्यांसाठी सांगलीत आंदोलन केले आहेत. त्यांच्या मृत्यूने सांगलीत शोककळा पसरली आहे. ही घटना पूर्ववैमनस्यातून घडली की किरकोळ वादातून याचा सांगली पोलिस तपास करत आहेत.

logo
marathi.freepressjournal.in