सर्वपक्षीय शिष्टमंडळावरुन संजय राऊत संतप्त! पण शरद पवार ठाम - ‘राष्ट्रहितापुढे स्थानिक राजकारण नको!'

सर्वपक्षीय शिष्टमंडळावरुन संजय राऊत संतप्त! पण शरद पवार ठाम - ‘राष्ट्रहितापुढे स्थानिक राजकारण नको!'

अलीकडेच पार पडलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’ या लष्करी कारवाईनंतर भारत सरकारने आता जागतिक पातळीवर पाकिस्तानच्या दहशतवादी कारवायांचा पर्दाफाश करण्यासाठी एक Delegation of all-party MPs नेमले आहे. या शिष्टमंडळाच्या माध्यमातून भारताची दहशतवादविरोधी भूमिका आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर ठळकपणे मांडण्यात येणार आहे. मात्र या शिष्टमंडळाच्या स्थापनेवरून महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळात वाद निर्माण झाला आहे.
Published on

अलीकडेच पार पडलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’ या लष्करी कारवाईनंतर भारत सरकारने आता जागतिक पातळीवर पाकिस्तानच्या दहशतवादी कारवायांचा पर्दाफाश करण्यासाठी एक सर्वपक्षीय खासदारांचे शिष्टमंडळ नेमले आहे. या शिष्टमंडळाच्या माध्यमातून भारताची दहशतवादविरोधी भूमिका आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर ठळकपणे मांडण्यात येणार आहे. मात्र या शिष्टमंडळाच्या स्थापनेवरून महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळात वाद निर्माण झाला असून, शिवसेना (उद्धव ठाकरे गट)चे नेते संजय राऊत यांनी सरकारवर टीका केली आहे. त्यावर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी ठाम उत्तर देत राजकीय परिपक्वतेचे उदाहरण दिले आहे.

संजय राऊत यांची तीव्र टीका

शिष्टमंडळाच्या रचनेत ठाकरे गटातील केवळ एकच खासदार, प्रियंका चतुर्वेदी यांचा समावेश करण्यात आला आहे. आपल्या गटाला डावलल्यामुळे संजय राऊत यांनी केंद्र सरकारवर नाराजी व्यक्त करत म्हटले, “लोकसभेत ठाकरे गटाचे नऊ खासदार आहेत, जे शिंदे गटापेक्षा एकाने अधिक आहेत. मात्र शिष्टमंडळ निवडताना आम्हाला विचारण्यात आलं नाही. खरं तर आम्हाला शिष्टमंडळाचे नेतृत्व द्यायला हवं होतं. हे सरकार पुन्हा राजकारण करत आहे. सरकारी खर्चावर हे वऱ्हाड परदेशात काय करणार? जे काम आपली हाय कमिशनर मंडळं करत आहेत, तेच हे खासदार करणार? मग ही नौटंकी कशासाठी?"

पुढे त्यांनी यावरून सरकारला लक्ष्य करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करत म्हंटले, “दोनशे देश फिरूनही एकही देश भारताच्या बाजूने उभा राहात नसेल, तर या नौटंकीची वेळ का आली?” असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.

शरद पवारांचे परखड प्रत्युत्तर

या टीकेला प्रत्युत्तर देताना शरद पवार यांनी स्पष्ट शब्दांत म्हटले, “आंतरराष्ट्रीय विषयांवर पक्षीय राजकारण करणं योग्य नाही. हे स्थानिक राजकारण करण्याचं ठिकाण नाही. अशा प्रसंगी भारताची एकत्रित भूमिका जगासमोर मांडणे आवश्यक असते.”

पवार यांनी आपला अनुभव सांगताना म्हंटले की, “जेव्हा नरसिंह राव यांचे सरकार होते, तेव्हा अटल बिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राचे शिष्टमंडळ नेमण्यात आले होते. त्यावेळी माझी निवड करण्यात आली होती आणि यामध्ये कुठल्याही पक्षाचा आग्रह नव्हता. हे राष्ट्रीय पातळीवरील विषय असतात, त्यामुळे स्थानिक मतभेद इथे आणू नयेत.”

पवारांच्या या विधानाने संजय राऊत यांची टीका अप्रत्यक्षपणे फेटाळण्यात आली आहे. तसेच, राष्ट्रीय सुरक्षेच्या मुद्द्यावर सर्व पक्षांनी एकत्र येण्याचे महत्त्व शरद पवार यांनी अधोरेखित केले आहे.

शिष्टमंडळाची भूमिका व महाराष्ट्राचा सहभाग

‘ऑपरेशन सिंदूर’बाबत परदेशात भारताची बाजू मांडण्यासाठी केंद्र सरकारने शनिवारी रात्री उशिरा ५९ जणांच्या शिष्टमंडळाची घोषणा केली. त्यात ५१ नेते आणि ८ राजदूतांचा समावेश आहे. ‘एनडीए’चे ३१ आणि इतर पक्षांचे २० सदस्य शिष्टमंडळात आहेत, ज्यात ३ काँग्रेस नेत्यांचा समावेश आहे. हे शिष्टमंडळ संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या सदस्य देशांना भेट देईल. तसेच जगातील महत्त्वाच्या देशांना भेटी देऊन तिथे ‘ऑपरेशन सिंदूर’ आणि पाकिस्तानपुरस्कृत दहशतवादाबद्दल भारताची भूमिका मांडण्यात येणार आहे. हे शिष्टमंडळ २३ किंवा २४ मे रोजी निघणार असल्याचे कळते. या शिष्टमंडळाची ७ गटांमध्ये विभागणी केली आहे. प्रत्येक गटात एका खासदाराला नेता बनवले आहे. प्रत्येक गटात ८ ते ९ सदस्य आहेत. यात ६-७ खासदार, ज्येष्ठ नेते (माजी मंत्री) आणि राजदूतांचा समावेश आहे. सुप्रिया सुळे, मिलिंद देवरा, श्रीकांत शिंदे, प्रियंका चतुर्वेदी या महाराष्ट्रातील चार खासदारांचा परदेशात जाणाऱ्या शिष्टमंडळात समावेश आहे.

logo
marathi.freepressjournal.in