शिंदे गटात फूट पडणार? जळगाव ठरणार केंद्र; खासदार संजय राऊत यांनी दिले संकेत

शिवसेना (शिंदे गट) मध्ये पुन्हा एकदा मोठी राजकीय उलथापालथ होण्याची शक्यता व्यक्त करत खासदार संजय राऊत यांनी जळगाव जिल्हा हा संभाव्य घडामोडींचे केंद्र ठरू शकतो, असे संकेत दिले आहेत.
शिंदे गटात फूट पडणार? जळगाव ठरणार केंद्र; खासदार संजय राऊत यांनी दिले संकेत
शिंदे गटात फूट पडणार? जळगाव ठरणार केंद्र; खासदार संजय राऊत यांनी दिले संकेत
Published on

जळगाव : शिवसेना (शिंदे गट) मध्ये पुन्हा एकदा मोठी राजकीय उलथापालथ होण्याची शक्यता व्यक्त करत खासदार संजय राऊत यांनी जळगाव जिल्हा हा संभाव्य घडामोडींचे केंद्र ठरू शकतो, असे संकेत दिले आहेत. त्यांच्या या विधानामुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

राऊत यांनी सांगितले की, एकनाथ शिंदे यांनी शिवसेना फोडल्यानंतर गुवाहाटीला गेलेल्या आमदारांमध्ये जळगाव जिल्ह्यातील पाच आमदारांचा समावेश होता. आता पुन्हा शिंदे गटात फूट पडण्याच्या हालचाली सुरू असून, त्यात जळगावमधील काही आमदारांचा समावेश असू शकतो. विशेषतः पारोळा, मुक्ताईनगर आणि चोपडा येथील आमदार हे भाजप नेते गिरीश महाजन यांच्या संपर्कात असल्याचे राऊत यांनी सांगितले. त्यामुळे हे आमदार आगामी निवडणुका भाजपच्या तिकिटावर लढवण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली.

शिंदे गटात फूट पडणार? जळगाव ठरणार केंद्र; खासदार संजय राऊत यांनी दिले संकेत
महायुतीत खदखद; सातारा जि.प. निवडणुकीवरून विधिमंडळात घमासान

याचबरोबर शिंदे गटातील सुमारे २५ आमदार भाजपमध्ये प्रवेश करू शकतात, असा दावाही राऊत यांनी केला. गुवाहाटीला गेलेल्या आमदारांवर ‘गद्दार’ अशी प्रतिमा निर्माण झाल्याने मतदारांमध्ये नाराजी असल्याचेही त्यांनी नमूद केले. जिल्ह्यात राजकीय हुकूमशाही सुरू असल्याचा आरोप करत राऊत यांनी पोलिसांवरही टीका केली. सत्ताधारी पक्षाचे मंत्री आणि आमदार विरोधकांना दडपण्यासाठी पोलिसांचा वापर करत असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला. या सर्व घडामोडींमुळे जळगाव जिल्ह्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले असून, आगामी काळात शिंदे गटातील हालचालींकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

पोलिसांचे कौतुक

नाशिकमधील अशोक खरातप्रकरणी सुरू असलेल्या तपासाचे राऊत यांनी कौतुक केले. त्यांनी सांगितले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गृहमंत्री म्हणून कठोर भूमिका घेतली असून तपास योग्य दिशेने सुरू आहे. तसेच नाशिकचे पोलीस अधीक्षक संदीप कर्णिक आणि एसआयटीकडून सुरू असलेल्या तपासाचीही त्यांनी प्रशंसा केली.

शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सरकारवर टीका

जळगाव दौऱ्यावर असताना राऊत यांनी जिल्ह्यातील अवकाळी पावसामुळे झालेल्या शेती नुकसानीकडेही लक्ष वेधले. सरकार आणि पालकमंत्र्यांनी शेतकऱ्यांच्या अडचणींकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप त्यांनी केला. तसेच ‘संकटमोचक’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गिरीश महाजन यांच्यावर अप्रत्यक्ष टीका करत, “आमदार फोडणे, पक्ष फोडणे हेच का संकटमोचकाचे काम आहे? शेतकऱ्यांवर संकट असताना ते पुढे का येत नाहीत?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

logo
marathi.freepressjournal.in