संजय राऊत यांना गंभीर आजार; बाहेर जाण्यास, गर्दीत मिसळण्यास निर्बंध, पोस्ट करीत म्हणाले - 'नवीन वर्षात भेटू'

शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्या प्रकृतीबद्दल पुन्हा एकदा चिंताजनक माहिती समोर आली आहे. त्यांच्या प्रकृतीत अचानक गंभीर बिघाड झाला असून पुढील दोन महिने त्यांना सार्वजनिक जीवनापासून पूर्ण विश्रांती घेण्याचा वैद्यकीय सल्ला देण्यात आला आहे.
संजय राऊत यांना गंभीर आजार; बाहेर जाण्यास, गर्दीत मिसळण्यास निर्बंध, पोस्ट करीत म्हणाले - 'नवीन वर्षात भेटू'
Published on

शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्या प्रकृतीबद्दल पुन्हा एकदा चिंताजनक माहिती समोर आली आहे. त्यांच्या प्रकृतीत अचानक गंभीर बिघाड झाला असून पुढील दोन महिने त्यांना सार्वजनिक जीवनापासून पूर्ण विश्रांती घेण्याचा वैद्यकीय सल्ला देण्यात आला आहे. तसेच, बाहेर जाणे आणि गर्दीत मिसळणे टाळावे असेही त्यांना सांगण्यात आले आहे.

राऊत यांचे भावनिक पत्र जाहीर

संजय राऊत यांनी या विषयी X वर एक पत्र प्रसिद्ध केले आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे, "आपण सगळ्यांनी माझ्यावर कायम विश्वास ठेवला आणि प्रेम केले, पण सध्या अचानक माझ्या प्रकृतीत काही गंभीर स्वरुपाचे बिघाड झाल्याचे समोर आले. उपचार सुरू आहेत, मी यातून लवकरच बाहेर पडेन. वैद्यकीय सल्ल्यानुसार मला बाहेर जाणे व गर्दीत मिसळणे यावर निर्बंध आले आहेत. त्यास नाईलाज आहे. मला खात्री आहे मी ठणठणीत बरा होऊन साधारण नवीन वर्षात आपल्याला भेटीन. आपले प्रेम आणि आशीर्वाद असेच राहू द्या."

काही दिवसांपूर्वी तब्येत बिघडल्याने संजय राऊत यांना मुलुंड येथील फोर्टिस हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. वैद्यकीय तपासणीनंतर त्यांना काही गंभीर स्वरूपाच्या आरोग्य समस्या असल्याचे डॉक्टरांनी निदान केले. उपचारानंतर त्यांची प्रकृती सध्या स्थिर असली तरी, डॉक्टरांनी त्यांना संपूर्ण विश्रांतीचा सल्ला दिला होता.

ठाकरे गटासाठी चिंतेची बाब

ठाकरे गटासाठी राऊत हे पक्षाचे मुख्य प्रवक्ते, रणनीतीकार आणि ठाकरे गटाचे प्रमुख चेहरे म्हणून ओळखले जातात. त्यामुळे मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटासाठी ही चिंतेची बाब आहे.

logo
marathi.freepressjournal.in