ससून रुग्णालयातील डॉक्टरसह सहकाऱ्यांवर गुन्हा दाखल; बेवारस रुग्णांवर उपचार करण्याऐवजी निर्जनस्थळी सोडण्याचा प्रकार उघडकीस

पुण्यातील ससून रुग्णालयात उपचार घेण्यासाठी येणाऱ्या बेवारस रुग्णांवर उपचार करण्याऐवजी रात्रीच्या वेळी त्या रुग्णांना ससूनमधील डॉक्टरच निर्जनस्थळी सोडून येत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
ससून रुग्णालयातील डॉक्टरसह सहकाऱ्यांवर गुन्हा दाखल; बेवारस रुग्णांवर उपचार करण्याऐवजी निर्जनस्थळी सोडण्याचा प्रकार उघडकीस
Photo credit: Anand Chaini
Published on

पुणे : पुण्यातील ससून रुग्णालयात उपचार घेण्यासाठी येणाऱ्या बेवारस रुग्णांवर उपचार करण्याऐवजी रात्रीच्या वेळी त्या रुग्णांना ससूनमधील डॉक्टरच निर्जनस्थळी सोडून येत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हा संपूर्ण प्रकार वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते रितेश गायकवाड व सामाजिक कार्यकर्ते दादासाहेब गायकवाड यांनी उघडकीस आणला आहे. याप्रकरणी येरवडा पोलीस ठाण्यात संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संबंधित डॉक्टरचे रुग्णालय प्रशासनाने निलंबन देखील केले आहे.

मध्य प्रदेश येथील निलेश नावाचा ३२ वर्षाचा रुग्ण हा १६ जून रोजी ससून रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाला होता. त्याच्यावर उपचार देखील झाले एवढंच नाही तर त्याच्या पायाची शस्त्रक्रिया देखील झाली आणि कालांतराने तो रुग्ण काही प्रमाणात बरा झाला. पण शस्त्रक्रिया झालेल्या अवघ्या काही दिवसात निवासी डॉक्टरांनी संबंधित रुग्णाला चक्क ऑटो रिक्षामध्ये बसत येरवड्याच्या एका निर्जनस्थळी सोडल्याचे समोर आले आहे. निर्जनस्थळी सोडत असल्याचा व्हिडीओ देखील समोर आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, २२ जुलै रात्री दीड वाजताची ही घटना आहे. ससून रुग्णालयातील डॉक्टर आदी कुमार यांनी बेवारस रुग्णांवर उपचार करून निर्जनस्थळी सोडून दिले. हा प्रकार वंचित आघाडीचे कार्यकर्ते रितेश गायकवाड व सामाजिक कार्यकर्ते दादासाहेब गायकवाड यांनी उघडकीस आणला आहे. त्यानुसार ससूनमधील डॉ. व त्याच्या सहकाऱ्यांवर गुन्हा दाखल झाला आहे. दादासाहेब गायकवाड हे रस्त्यावर बेवारस पडलेल्या जखमी व्यक्तींना ते ससून रुग्णालयात दाखल करतात. परंतु दुसऱ्या दिवशी त्या रुग्णाला पाहण्यासाठी गेल्यावर त्यांना तो रुग्ण गायब झाल्याचे लक्षात आले.

त्यानंतर त्यांनी तपास केला त्यावेळी हा गैरप्रकार समोर आला. रुग्णालयातील या गलथान कारभाराचा भांडाफोड करण्यासाठी त्यांनी तपास सुरू केला.

आमदार रवींद्र धंगेकर आक्रमक

घटनेची माहिती मिळताच पुण्याचे आमदार रवींद्र धंगेकर यांनी ससून रुग्णालयातील डीन यांची भेट घेतली. संबंधित डॉक्टरला निलंबित करण्याची त्यांनी मागणी केली. निलंबित करूनच या डॉक्टरची चौकशी करण्यात यावी असाही त्यांनी आग्रह धरला. आमदार रवींद्र धंगेकर यांच्या मागणीनुसार डॉक्टरचे निलंबन झाले असून प्रशासनाकडून चौकशी सुरू झाली आहे.

logo
marathi.freepressjournal.in