

मुंबई पोलिसांच्या क्राईम ब्रँचने मोठी कारवाई करत सातारा जिल्ह्यातील जावळी तालुक्यातील सावली गावात एमडी (मेफेड्रोन) ड्रग्स तयार करणारा कारखाना (१३ डिसेंबर) उद्ध्वस्त केला. धक्कादायक बाब म्हणजे हा कारखाना चक्क एका म्हशीच्या गोठ्यात सुरू होता. या कारवाईमुळे जिल्ह्यासह राज्यभरात खळबळ उडाली आहे. दरम्यान, या घटनेवर काँग्रेस आमदार सतेज पाटील यांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे."वोटचोरी करून सत्तेवर बसलेले फडणवीस–शिंदे–पवार सरकार महाराष्ट्राला “उडता महाराष्ट्र” बनवण्याच्या दिशेने चालले आहे का? गृहमंत्री अद्याप गप्प का? असा सवाल सतेज पाटील यांनी उपस्थित केला आहे.
सतेज पाटील म्हणाले, "साताऱ्यात उघडकीस आलेल्या ड्रग्स निर्मिती केंद्रात दोन्ही उपमुख्यमंत्र्यांशी संबंधित व्यक्तींचा सहभाग समोर आल्याने, या काळ्या धंद्याला राजकीय संरक्षण मिळत असल्याचे स्पष्ट झाले आहे."
पुढे ते म्हणाले, "महाराष्ट्रातील वाढत्या ड्र्ग्ज प्रकरणात मी उन्हाळी अधिवेशनात आवाज उठवून महाराष्ट्राला नशामुक्त करण्याची कळकळीची मागणी केली होती. मात्र सत्तेची नशा चढलेल्या राज्यकर्त्यांना राज्यातील युवा पिढीचे भविष्य जपण्यापेक्षा, त्यांच्या गोरखधंद्यांचे संरक्षण करण्यातच अधिक स्वारस्य असल्याचे दुर्दैवी चित्र स्पष्ट झाले."
"महाराष्ट्राला ड्रग्सच्या विळख्यात लोटणाऱ्या या अत्यंत गंभीर घटनेवर गृहमंत्री अद्याप गप्प का आहेत?" असा प्रश्न उपस्थित करत 'या प्रकरणावर तातडीने खुलासा करून निष्पक्ष चौकशी व कठोर कारवाई करणे ही सरकारची जबाबदारी आहे." असे मत सतेज पाटील यांनी व्यक्त केले आहे.
नेमके प्रकरण काय?
शनिवारी (दि. १३) पहाटे करण्यात आलेल्या छापेमारीदरम्यान क्राईम ब्रँचने ७ किलो ७१८ ग्रॅम एमडी ड्रग्स तसेच ३८ किलो द्रवरूप रसायने व कच्चा माल जप्त केला आहे. बाजारभावानुसार या मुद्देमालाची किंमत सुमारे १५ कोटी रुपये इतकी असल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणी तीन बांगलादेशी नागरिकांसह चौघांना अटक करण्यात आली असून, तिघे आरोपी ड्रग्स निर्मितीसाठी कारागीर म्हणून काम करत असल्याची माहिती समोर आली आहे. दिवसभर चाललेल्या कारवाईनंतर सर्व आरोपींना पुढील तपासासाठी मुंबईला रवाना करण्यात आले आहे.
या कारखान्याची माहिती स्थानिक पोलिसांना नसणे ही गंभीर बाब मानली जात असून, या प्रकरणामुळे यंत्रणेच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. तसेच या ड्रग्स कारखान्याचे काही राजकीय संबंध असल्याचे आरोपही पुढे येत असून, त्यामुळे प्रकरणाला वेगळे वळण लागले आहे.
मुंबई क्राईम ब्रँचने या प्रकरणात आंतरराज्यीय व आंतरराष्ट्रीय कनेक्शनचा तपास सुरू केला असून, या ड्रग्स रॅकेटमागील संपूर्ण साखळी उघड करण्यासाठी तपास वेगाने सुरू असल्याचे सांगण्यात आले आहे.